Thursday, June 18, 2020

महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नरत - महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर


उमेद अभियानात महिला बचत गटांना मास्कविक्रीतून मिळाले सव्वासतरा लाख रूपये


 

कोरोना संकटकाळात मास्कनिर्मितीच्या कामाने जिल्ह्यात महिला बचत गटांना रोजगार पुरवला असून, उमेद अभियानात बचत गटांद्वारे सुमारे 1 लाख 46 हजार 930 मास्कची विक्री होऊन त्यांना अद्यापपावेतो 17 लाख 25 हजार 519 रूपये उत्पन्न मिळाले आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली._

कोरोना विषाणूला प्रतिबंधासाठी कापडी मास्कची उपयुक्तता लक्षात घेऊन जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुती कापडाचे मास्क तयार करण्यासाठी आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले होते. त्यांच्या प्रयत्नाने प्रारंभी कारागृहातील बंदीजनांकडून व त्यानंतर कस्तुरबा महिला बचत गट समितीकडून सोलर चरख्याच्या माध्यमातून मास्कनिर्मिती सुरू करण्यात आली. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातही बचत गटांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर मास्कनिर्मिती सुरु करण्यात आली. 

उमेद अभियानात जिल्ह्यात स्वयंसहाय्यता समूहांना मास्क बनविण्याकरिता व विक्रीकरिता जिल्हा व तालुका अभियान कक्ष समूहातील महिलांना मार्गदर्शन करत आहेत. जिल्ह्यात एकूण 178 समूह हे मास्क बनविण्याच्या कामामध्ये  गुंतलेले आहेत व समूहातील अंदाजे सुमारे दीड हजार भगिनींकडून उत्तम प्रकारचीमास्कनिर्मिती होत आहे. आजपर्यंत एक लाख 51 हजार 255 मास्कची निर्मिती झाली आहे. त्यापैकी 1 लाख 46 हजार 930 मास्कची विक्री होऊन 17 लाख 25 हजार 510 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.  

कोरोना संकटकाळात अहोरात्र राबणा-या जिल्हा प्रशासनातील अधिकारी- कर्मचारी, आरोग्य विभाग, वनविभाग तसेच विविध शासकीय तसेच निमशासकीय विभागांकडून या स्वयंसहायता समूहांना मास्क बनविण्याकरिता ऑर्डर दिली जात आहे. त्यामधून या महिलांना रोजगार मिळत आहे.  ग्राम स्तरावर या महिला कोरोना वॉरिअर्स म्हणून काम करत आहेत. गावातील गरीब वंचित घटकातील कुटुंबाना ग्राम संघाकडून घरपोच किराणा देण्यात येत आहे. या संकट समयी गरिबांच्या जीवनामध्ये आशेची ज्योत या महिला जागवित आहे. अश्या प्रकारे उमेद अभियानाचे ग्राम स्तरावर मोलाचे काम ठरत आहे, अशी माहिती उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख यांनी दिली.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके यांच्याकडून याकामी वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. उमेद स्वयंसहाय्यता समूह ग्राम संघ यांच्या उत्कृष्ट कार्याची व विविध योजनांची माहिती महिला व समुदाय संसाधन व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी वैदर्भी वार्तापत्रही नियमितपणे प्रसारित होत असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

स्थानिक प्रदेशात पिकणा-या कापसापासून सुती कापड तयार करण्याचे काम केले जाते. त्यांच्याकडून तयार मास्क दुपदरी सुती कापडाचे असून सुरक्षित आहेत. हे मास्क स्वच्छ करुन पुनर्वापर करता येतो. स्वयंस्फूर्तीनेही अनेक गट यात सहभागी झाले असून, रोजगारही उपलब्ध होत आहे. अशा विविध बचत गटांकडून अद्यापपर्यंत अडीच लाखांवर मास्कनिर्मिती झाली आहे.

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...