सेतू केंद्रावरील कार्यपद्धती सुलभ व सुटसुटीत जात व इतर प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन प्रतिज्ञापत्र देण्याची गरज नाही - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


ऑनलाईन सेवांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 4 : कोरोना प्रतिबंध उपाययोजनांनुसार गर्दी टाळण्यासाठी व कामाला गती येण्यासाठी अनावश्यक कागदपत्रांना फाटा देत सेतू केंद्रावरील कार्यपद्धती सुटसुटीत व सुलभ करण्यात आली आहे. त्यानुसार जात, नॉन क्रिमीलेयर, अधिवास व उत्पन्न प्रमाणपत्रांसाठी प्रतिज्ञापत्र देण्याची गरज राहिलेली नाही. त्याचप्रमाणे, घरबसल्या प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपले सरकार पोर्टल व आरटीएस महाराष्ट्र या ॲपचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

या प्रमाणपत्रांसाठी नागरिकांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याऐवजी स्वयंघोषणापत्र घ्यावे, अन्यथा केंद्रचालकावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आपले सेवा केंद्रचालकांना दिले आहेत.

सर्व केंद्रचालकांनी कार्यरत ऑपरेटरांना अर्जदारांचे स्वयंघोषणापत्र आदी कागदपत्रे पीडीएफ किंवा जेपीजी फॉर्मटमध्ये 75 केबी ते 100 केबी साईजमध्ये अपलोड करण्याच्या सूचना द्याव्यात. जातीच्या प्रमाणपत्राबाबत अर्जदार यांनी त्यांच्या वंशावळीबाबत स्वत:च प्रतिज्ञापत्र सादर करावे. अर्जदाराच्या वडलांचे किंवा रक्तसंबंधातील नातेवाईकाचे जातीचे प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र असल्यास त्या अर्जदारास इतर कागदपत्रांची मागणी करू नये. जर असे प्रमाणपत्र नसेल तरच कोतवाल बुक व त्या अनुषंगिक कागद, पुरावा घ्यावा, तसेच प्रतिज्ञापत्राऐवजी स्वयंघोषणापत्र ग्राह्य धरावे. अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

आपले सरकार पोर्टलचा वापर करून आवश्यक तपशील दिल्यास ऑनलाईन प्रमाणपत्र उपलब्ध करून दिली जातात. ही सोपी, सुलभ पद्धती आहे. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर आरटीएस महाराष्ट्र हे ॲपही उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते वापरल्यास सेतू केंद्रातही जाण्याची आवश्यकता नाही. हे ॲप व पोर्टल वापरून घरबसल्या प्रमाणपत्र मिळवता येते. त्याचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांनी केले.

त्या म्हणाल्या की, आपले सरकार पोर्टलचा पत्ता http://aaplesarkar.mahaonline.gov.inअसा आहे. यातील सेवा हक्क कायदा या टॅबवर क्लिक करून वापरकर्त्याने प्रथम नोंदणी करावी.  नोंदणी दोन प्रकारे करता येते. आधार कार्डाद्वारे नोंदणी करताना वैध आधार क्रमांक नमूद करावा. त्यानंतर वापरकर्त्याच्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी कोड पाठवला जातो. तो कोड अपेक्षित टॅबमध्ये नोंदवावा.

त्याचप्रमाणे, तपशील मॅन्युअली भरून आणि आवश्यक दस्तऐवज अपलोड करून आणि मोबाईल ओटीपी पडताळणीद्वारेदेखील नोंदणी करता येते. त्यासाठी आवश्यक माहिती भरून आणि नंतर मोबाईल ओटीपीने नागरिकांना स्वत:ची नोंदणी करून घेता येते. नोंदणी करताना ज्या जिल्ह्यात अर्ज करायचा आहे, तो निवडावा. यानुसार आयडी व पासवर्ड प्राप्त झाल्यावर लॉगिन करून अपेक्षित संबंधित जिल्ह्याचा उपविभाग निवडावा. त्यानंतर महसूल सेवा या टॅबवर क्लिक करून अपेक्षित प्रमाणपत्राच्या विषयावर क्लिक करावे. जात प्रमाणपत्र हवे असल्यास आवश्यक कागदपत्रांची यादी पाहून तपशील भरावा. अर्ज दाखल केल्यावर फोटो, सही, कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे. सेवा शुल्क भरून पोचपावती जतन करावी. अर्जाच्या स्थितीबाबत संदेश नोंदणीकृत मोबाईलवर पाठवला जातो. अर्ज मंजूर झाल्यावर लॉगिन करून आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेता येते, अशी माहिती उपजिल्हाधिकारी श्रीमती कनिचे यांनी दिली.

 

                                    00000   

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती