कापूस खरेदीला गती देण्यासाठी पालकमंत्र्यांचा पाठपुरावा


 दर्यापूर येथे ‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार

   -  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


         कापूस खरेदीला गती देण्यासाठी भारतीय कपास निगमकडून (सीसीआय) दर्यापूर येथे केंद्र सुरु करण्याच्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मागणीनुसार लवकरच हे केंद्र सुरू होणार आहे. तशी माहिती निगमचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार अग्रवाल यांनी पालकमंत्र्यांना कळवली आहे.

          निगमच्या अकोला येथील शाखा कार्यालयाला दर्यापूर येथील कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी तत्काळ हालचाली करण्याचे निर्देशही श्री. अग्रवाल यांनी दिले असल्याचे पत्रात नमूद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्राची संख्या नऊवर पोहोचून खरेदीला गती मिळणार आहे. जिल्ह्यात एकूण आठ कापूस खरेदी केंद्रे आहेत. त्यातील एक सीसीएचे असून, ते धामणगाव रेल्वे आहे. उर्वरित केंद्रे सात पणन महासंघाची आहेत. 

         कोविड-19 च्या अनुषंगाने संचारबंदी लागू असल्याने कापूस खरेदी प्रक्रियेत अडचणी आल्या व कापूस उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत सापडला.  ही बाब लक्षात घेऊन कापूस खरेदीला गती देण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून प्रक्रियेला गती दिली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह वेळोवेळी चर्चा करून अडचणी जाणून घेत शासनाकडे, तसेच संबंधित यंत्रणांकडे त्याचा पाठपुरावा केला.

         त्यामुळे शासकीय हमीभाव योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील यापूर्वी नोंदणी करू न शकलेल्या शेतक-यांच्या कापूस विक्रीसाठी 3 ते 6 जून दरम्यान पुन्हा नोंदणी करण्याचाही निर्णय झाला. नोंदणीपासून वंचित राहिलेल्या हजारो शेतकरी बांधवांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

         त्याचप्रमाणे, कापूस खरेदीला वेग देण्यासाठी खरेदी केंद्रांवरील जीनची संख्या 18 वरून 25 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्यासाठी राज्य कापूस पणन महासंघाला जिल्हा प्रशासनाकडून पर्यवेक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदी प्रक्रियेला वेग येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 10 कृषी पर्यवेक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या. या सर्व पर्यवेक्षकांना ग्रेडिंगबाबत प्रशिक्षण देण्यात आले. पणन महासंघाला हे प्रशिक्षित मनुष्यबळ प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले. आतापर्यंत 31 हजार 547 शेतक-यांची सुमारे आठ लाख 43 हजार क्विंटल कापूस खरेदी झाली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली. आता दर्यापूर येथे सीसीआयचे केंद्र सुरु होणार असल्याने खरेदीला प्रक्रियेला अधिक गती येईल, असेही श्री. जाधव म्हणाले.

         कापूस खरेदी प्रक्रियेत सोशल डिस्टन्स, मास्क आदी दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. मात्र, दक्षता पाळताना कामाच्या वेगही कायम ठेवावा लागेल. सर्वांची सुरक्षितता जपून प्रत्येक कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. दिवसभरात केंद्रावर येणा-या सर्व गाड्यांची खरेदी त्याच दिवशी पूर्ण व्हावी. गाड्यांची मर्यादा वाढवावी. वाढत्या तापमानामुळे आगी लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तयार गाठींच्या संकलनासाठी गोदामांची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. नियोजनानुसार खरेदी झाली पाहिजे. त्यादृष्टीने सीसीआय, पणन महासंघ यांनी प्रयत्न करावे. कुठल्याही अडचणी आल्या तर  तत्काळ निदर्शनास आणून द्यावे. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांची गैरसोय होता कामा नये. त्यासाठी नियोजनपूर्वक कामे करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.


 


                                                                000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती