Monday, June 15, 2020

शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक


तपासण्यांची संख्या वाढवा

-         शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

अमरावती, दि. 15 : चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे कोरोनाचा रूग्ण आढळला.  या पार्श्वभूमीवर लक्षणे आढळणा-या व्यक्तींच्या तपासण्यांची संख्या वाढवावी व ग्रामीण रूग्णालयात स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून द्यावा, असे आदेश जलसंपदा, कामगार, शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी चांदूर बाजार येथे नुकतेच दिले.

            राज्यमंत्री श्री. कडू यांनी नुकतेच चांदूर बाजार तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार अभिजित जगताप, गटविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बोरखडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

            राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, सध्या पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. त्यात सर्दी, खोकला व तापाचे रूग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामीण रूग्णालयात वेगळा कक्ष उभारून मनुष्यबळ वाढवावे. आवश्यक मनुष्यबळ व साहित्याचा प्रस्ताव द्यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.  यानिमित्त आरोग्य सुविधा व इतर कामांचाही आढावा त्यांनी घेतला.

वेषांतर करून कृषी केंद्रावर नजर ठेवा

सध्या पेरणीचा हंगाम असल्याने कृषी केंद्रात जास्त भावाने बियाणे, खते विकण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नकली बियाण्यांचाही शिरकाव झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी केंद्रावर खरेदीसाठी जाणा-या नागरिकांत सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. त्यामुळे कृषी विभागाने वेषांतर करून कृषी केंद्रांवर पाळत ठेवावी व वेळोवेळी तपासणी करावी. कुणीही दोषी आढळल्यास कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी दिले.

बाजार समितीचे संचालक मंगेश देशमुख, दीपक भोंगाडे, ठाणेदार उदयसिंग साळुंके, सचिन परदेशी, नायब तहसीलदार अर्जुन वांदे, निलिमा मते, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, नारायण आमझरे, मुख्याधिकारी रवी पाटील, परिमल देशमुख, पूजा धर्माळे, राजेंद्र जाधव, डॉ. संध्या साळकर, डॉ. अमोल हरणे, डॉ. ज्योत्स्ना भगत आदी यावेळी उपस्थित होते.

                                                00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...