लॉकडाऊनच्या काळात धान्यपुरवठ्यासाठी शासनाचे विविध कल्याणकारी निर्णय


वितरणाची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करा

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

 

अमरावती, दि. 21 : कोरोना संकटकाळात जारी लॉकडाऊनच्या काळात गरजूंपर्यंत सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे धान्यवितरणासाठी राज्य शासनाने विविध कल्याणकारी निर्णय घेतले. जून महिन्यातही पावसाळा व इतर बाबी लक्षात घेऊन पुरवठ्याची गतीने अंमलबजावणी करत कुणीही पात्र व्यक्ती त्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. 


राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जूनसाठी प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने देण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत अंत्योदय योजना या प्राधान्य लाभार्थी योजनेतील कार्डवर प्रति लाभार्थी प्रति महीना 5 किलो तांदूळ विनामूल्य देण्याची योजना आहे. 


पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची तरतूद आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्डधारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर 8 दिवसांनी प्रति व्यक्ती  5 किलो तांदुळ  कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.  हा मोफत तांदूळ एप्रिल व मे नंतर जूनमध्ये सुध्दा उपलब्ध करून दिला जात आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी पुरवठा विभागाने करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.   

जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी  तसेच शेतकरी लाभार्थी याची असून एकूण 5 लाख 28 हजार 147 रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 25 लाख 47 हजार 396 इतकी आहे. या लाभार्थ्यांना 1 हजार 939 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. कोरोना संकटकाळ, तसेच पावसाळा लक्षात घेता पुरवठ्याची कार्यवाही नियमित व सुरळीत ठेवावी. मेळघाटकडे प्राधान्याने लक्ष पुरवावे. मेळघाटातील दुर्गम भागात पुरवठ्याची कार्यवाही अधिक प्रभावीपणे करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले. 

स्वस्त धान्य दुकानांतून गैरव्यवहार होता कामा नयेत. त्यासाठी वेळोवेळी तपासण्या कराव्यात व आक्षेपार्ह बाब आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.


लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अडकलेल्या साडेतीन हजारहून अधिक शिधापत्रिकाधारकांनी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. आत्मनिर्भर भारत या योजनेचा अन्नधान्य लाभ मे नंतर आता जून महिन्यासाठीही असून त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती 5 किलो मोफत तांदुळ दिला जात आहे. 

  

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चना डाळ) देण्याची तरतूद आहे.  त्यानुसार जिल्ह्यात एप्रिल, मे व जून या तिन्ही महिन्यांसाठी प्रतिमहिना 178 मे. टन तूरडाळ व 267 मे. टन चणा डाळ उपलब्ध करून देण्यात आली, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी दिली. 

           पुरवठा विभागांतर्गत अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रति कार्ड 15 किलो गहू , 3 रुपये किलो दराने प्रति कार्ड 20 किलो तांदूळ दिला जातो. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 2 रु किलो दराने प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रु किलो दराने प्रति  व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जातो. शेतकरी लाभार्थी कार्ड वर 2 रु किलो दराने प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रु किलो दराने प्रति  व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जातो, असेही त्यांनी सांगितले.

                    

           

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती