Saturday, June 20, 2020

लॉकडाऊन काळात गरजूंना शिवभोजन थाळीचा आधार - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

जिल्ह्यात प्रतिदिन अडीच हजार थाळ्यांचे वितरण


 

अमरावती, दि. 20 :  कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जारी लॉकडाऊनच्या काळात गरजू बांधवांसाठी  शिवभोजन थाळीचे दर पाच रूपये करण्यात आले असून, जिल्ह्यात विविध केंद्रांवरून अडीच हजार थाळ्यांचे वितरण होत आहे. गरीब, वंचित व गरजू बांधवांसाठी ही योजना लॉकडाऊनच्या काळात आधार ठरली आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे सांगितले.

राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी यंदाप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ झाला. सुरुवातीला जिल्हा मुख्यालयी सुरु झालेली ही योजना लवकरच योजनेचा विस्तार करून तालुकास्तरापर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आली.  

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावानंतर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर राज्यात काम करणारे मजुर, स्थलांतरीत लोक, बेघर लोक तसेच बाहेरगावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना शिवभोजन थाळीने मोठा आधार दिला. लॉकडाऊन काळात या सर्वांचे जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून योजनेतील थाळीची किंमत  तीन महिन्यांसाठी प्रति थाळी 5 रुपये इतकी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गरजू नागरिकांना यामुळे  मदत झाली आणि अनेक नागरिक योजनेतील थाळीचा लाभ घेत आहेत, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यावेळी सांगितले.

 

केंद्रचालकांना दिले जाते अनुदान

 

लॉकडाऊन काळात शिवभोजन थाळीसाठी शासनाने निश्चित केलेली किंमत शहरी भागात 50 रुपये प्रति थाळी असून ग्रामीण भागात 35 रुपये इतकी आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक ग्राहकाकडून थाळीपोटी केवळ 5 रुपये आकारले जातात. त्याव्यतिरिक्त  उर्वरित रक्कम अनुदान म्हणून केंद्रचालकाला देण्यात येते. शहरी भागात अनुदानाची ही रक्कम 45 तर ग्रामीण भागात 30 रुपये इतकी आहे.  

जिल्ह्यात शिवभोजन योजनेअंतर्गत 22 केंद्रे कार्यरत आहेत. परतवाडा येथे अनिल उपाहारगृह व कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्ञानेश्वरी उपाहारगृह, धामणगाव रेल्वे येथे भगतसिंह चौकातील गणेश भोजनालय, तसेच अंबिका भोजनालय, तिवसा तालुक्यात तळेगाव ठाकूर गोदावरी महिला बचत गट, दर्यापूरला बसस्थानकानजिक गोपाळ हॉटेल व कृषी उत्पन्न बाजार समितीनजिक प्रसाद उपाहारगृह, धारणीला बसस्थानकानजिक गुरूकृपा भोजनालय, नांदगाव खंडेश्वर येथे चव्हाळे शाही भोजनालय व बसस्थानकानजिक राणा उपाहारगृह, चांदूर बाजार येथे बसस्थानकानजिक राहूल बहुउद्देशीय शिक्षण संस्था, चांदूर रेल्वे येथे राजश्री फॅमिली गार्डन येथे शिवभोजन थाळी उपलब्ध आहे.

 

अमरावतीत डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय परिसरात महालक्ष्मी उपाहारगृह, जिल्हा रुग्णालयात आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ उपक्रम, कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी भोजनालय, एसटी उपाहारगृह, सरोज चौकात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह  कन्झुमर्स फेडरेशन उपक्रम, भातकुली बसस्थानकानजिक साई योगी फॅमिला गार्डन उपाहारगृह, अंजनगाव सुर्जी येथे समता भोजनालय, वरूड येथे बसस्थानकामागे यशवंत महिला केटरर्स, मोर्शी येथे बसस्थानकासमोर यशवंत महिला केटरर्स आदिवासी बचत गट येथे शिवभोजन थाळी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, _चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथे_ स्व. हरिराम बाबुलाल बहुउद्देशीय शिक्षण संस्था येथेही थाळी उपलब्ध असून, स्थानिक बांधव त्याचा लाभ घेत आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी दिली.

शिवभोजन केंद्र चालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे, असेही श्री. टाकसाळे यांनी सांगितले.

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...