राज्यातील नेत्रदान चळवळीला नवी दृष्टी देण्याचे काम हरीना फाऊंडेशनने करावे - महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

नेत्रदान दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम



 

अमरावती, दि. 10 : नेत्रदानाबाबत अनेक गैरसमज, अंधश्रद्धा आणि रूढी परंपरेचा पगडा असूनही जिल्ह्यात जिल्हा रूग्णालय व हरीना फाऊंडेशनसारख्या अनेक संस्थांच्या समन्वयातून नेत्रदान चळवळीला गती मिळाली आहे. त्यामुळे अमरावती जिल्हा नेत्रदानाच्या कार्यात महाराष्ट्रात आघाडीवर आहे. राज्यातील नेत्रदान चळवळीला नवी दृष्टी देण्याचे काम हरीना फाऊंडेशन व जिल्ह्यातील संस्थांनी करावे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय नेत्रदान दिनानिमित्त हरीना नेत्रदान फाऊंडेशनतर्फे नेत्रदान रांगोळी स्पर्धा जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, हरीना फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज राठी, उपाध्यक्ष चंद्रकांत  रामप्रकाश गिल्डा,  सचिव अमित चांडक, सनी अरोरा, राजेंद्र वर्मा, सुरेंद्र पोपली, मोनिका उमक, रश्मी नावंदर  यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी व विविध संस्थांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

फाऊंडेशनतर्फे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात महारांगोळी काढून जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे, प्रत्येकाने आपल्या घरासमोर रांगोळी काढून त्याचे छायाचित्र पाठविणा-यांना बक्षीस देण्याचा स्पर्धात्मक उपक्रमही फाऊंडेशनतर्फे राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, राज्यातील मृत्यूचे प्रमाण व पश्चात होणारे नेत्रसंकलन यात मोठी तफावत आहे. ही तफावत कमी करून नेत्रदान प्रक्रियेची व्याप्ती वाढविण्यासाठी समाजात जनजागृती व प्रबोधनाची आवश्यकता आहे. हरीना फाऊंडेशनसारखी संस्था गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत आत्मीयतेने हे कार्य अमरावतीत पुढे नेत आहे. त्यामुळे नेत्रदान चळवळीला बळ मिळत आहे. या अनुषंगाने गत दहा वर्षांत राबविलेले विविध उपक्रम, प्रयत्न याद्वारे राज्यातील नेत्रदान चळवळीला नवी दृष्टी देण्याचे काम फाऊंडेशन व सहयोगी संस्थांनी करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

नेत्रदानाविषयीचे समाजमनात असलेले गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. अकाली अंधत्व आलेल्या नागरिकांवर शस्त्रक्रिया करून नवीन दृष्टीपटल बसवून त्याला दृष्टी मिळू शकते. मृत्यूनंतरही आपले डोळे दुस-याच्या आयुष्यात प्रकाश पेरून जग पाहू शकतात. नेत्रदानाच्या आपण घेतलेल्या निर्णयामुळे एखाद्याचे आयुष्य सुंदर आणि सुखकर होऊ शकते. ही जाणीव प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. दृष्टीहीनांच्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाश निर्माण करण्याचे कार्य नेत्रदानातून होते. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प आज आंतरराष्ट्रीय नेत्रदान दिनानिमित्त करूया, असे आवाहनही त्यांनी केले.

  अमरावती जिल्हा नेत्रदानाच्या कार्यात महाराष्ट्रात आघाडीवर आहे. मात्र, नेत्रदात्यांची संख्या वाढविण्यासाठी यापुढेही सतत प्रयत्न झाले पाहिजेत. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग पाहता येत नाही. त्यामुळे दृष्टीहीन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश निर्माण व्हावा व सौख्याचे रंग भरले जावेत, या हेतूने फाऊंडेशन उत्कृष्ट कार्य करत आहे. संस्थेतर्फे नेत्रदानदिनानिमित्तच नव्हे, तर वर्षभर विविध उपक्रम आयोजित केले जातात.  नेत्रदानाप्रमाणेच अवयवदान, देहदानाबाबतही अधिकाधिक जनजागृती करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

अमरावतीकर फाऊंडेशनतर्फे पाच हजार नागरिक अवयवदान व नेत्रदानाचे फॉर्म भरून देणार असल्याची माहिती श्रीमती उमक यांनी यावेळी दिली.कोरोना संकटकाळातील उत्कृष्ट कामाबद्दल यावेळी संस्थेतर्फे जिल्हाधिकारी व विविध मान्यवरांना गौरविण्यात आले.सीमेश श्रॉफ, रामप्रकाश गिल्डा, नीलेश चिठोरे, पप्पू गगलानी, प्रदीप चढ्ढा, प्रीतपालसिंग मोंगा, गिरधारीलाल बजाज, सुरेश जैन, जुगलकिशोर गट्टाणी, अजय टाके, काका राजगुरे, अविनाश राजगुरे, सुरेश वसाणी, घनश्याम वर्मा ओमप्रकाश चांडक, राजेंद्र वर्मा, मनीष सावला आदी उपस्थित होते.

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती