Tuesday, June 2, 2020

पालकमंत्र्यांच्या निर्देशाने जिल्ह्यात कापूस उत्पादक नोंदणी पुन्हा सुरु


नोंदणी न झालेल्या कापूस उत्पादकांना 3 ते 6 जून दरम्यान नोंदणी करता येणार

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

  अमरावती, दि. 2 : शासकीय हमीभाव योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील यापूर्वी नोंदणी करू न शकलेल्या शेतक-यांच्या कापूस विक्रीसाठी उद्यापासून (दि. 3 जून) दि. 6 जूनपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे. तरी अद्यापही नोंदणी न झालेल्या जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.  

कापूस उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर या वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे कापूस खरेदी सुरु करण्यापासून ते अनेक बाबींचा निवेदन व चर्चेद्वारे पाठपुरावा पालकमंत्र्यांनी केला. कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्याशीही चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या.  

कोविड-19 च्या अनुषंगाने संचारबंदी लागू असल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत सापडला. खरेदी व नोंदणीतही अडथळे आले. अनेक शेतकरी बांधव शासकीय हमीभाव योजनेंतर्गत नोंदणी करू शकले नाहीत. हे लक्षात घेऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी महासंघ व प्रशासनाशी चर्चा करून नोंदणीपासून वंचित शेतकरी बांधवांची तत्काळ नोंदणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाकडून तत्काळ हालचाली होऊन उद्यापासून नऊ ठिकाणी नोंदणी सुरु होणार आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी केंद्रनिहाय कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. अमरावती, भातकुली व तिवस्यासाठी अमरावती, नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे तालुक्यासाठी नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यासाठी धामणगाव रेल्वे, वरूड तालुक्यासाठी वरूड, मोर्शी तालुक्यातील मोर्शी, दर्यापूर तालुक्यासाठी दर्यापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यासाठी अंजनगाव सुर्जी, अचलपूर व धारणीसाठी अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यासाठी चांदूर बाजार येथील बाजार समितीकडे नोंदणी करता येणार आहे.

नोंदणी करण्यासाठी शेतकरी बांधवांनी सन 2019-20 चा कापूस पीक पेरा असलेला सातबारा, आधारकार्डाची व बँक खात्याची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, यापूर्वी शासकीय हमीभाव कापूस केंद्रावर कापूस नोंदणी, तसेच कापूस विक्री केलेल्या शेतक-यांनी पुन्हा नोंदणी करू नये. एका शेतक-याने एकदाच नोंदणी करावी व कापूस पेरा असलेले सर्व सातबारा त्या टोकन क्रमांकावर नोंदविण्यात यावेत, दिनांक सहा जूनपूर्वी कार्यालयीन वेळेनंतर कापूस नोंदणी बंद करण्यात येईल. त्यानंतर कापूस नोंदणी करण्यात येणार नाही, हे लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी बाजार समितीस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी केले आहे.

कापूस नोंदणी करताना कोरोना दक्षता प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करावे. ही नोंदणी प्रक्रिया गतीने राबवून अधिकाधिक शेतकरी बांधवांची नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.  

 

                                              000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...