मेळघाटातील 4 हजार कुटुंबांना अंत्योदय योजनेचा लाभ - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 


चावडीवाचनानंतर अपात्र नावांची वगळणी; गरजूंचा समावेश

मेळघाटातील 4 हजार कुटुंबांना अंत्योदय योजनेचा लाभ

-   जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

 अमरावती, दि. 31 : मेळघाट क्षेत्रात गावोगाव शिधापत्रिका चावडीवाचनाचा धडक कार्यक्रम राबवून मृत व अपात्र व्यक्तींची नावे वगळण्यात आली आणि अंत्योदय योजनेत पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या मोहिमेमुळे मेळघाटातील तब्बल 4 हजार कुटुंबांचा नव्याने अंत्योदय योजनेत समावेश होऊन त्यांना योजनेचा लाभ मिळाला.

गरीब व गरजू व्यक्तींना सवलतीच्या दरात धान्य मिळवून देण्यासाठी अंत्योदय योजना राबवली जाते. मेळघाटातील दुर्गम पाड्यापाड्यांवर या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनानुसार चिखलदरा व धारणी तालुक्यातील गावांमध्ये शिधापत्रिका चावडीवाचनाचा धडक कार्यक्रम राबविण्यात आला.

 या मोहिमेत शिधापत्रिकेतील मृत सदस्यांची नावे वगळण्याबरोबरच राज्याबाहेर किंवा इतर जिल्ह्यांत गेलेल्या व्यक्तींच्या शिधापत्रिका कमी करण्यात आल्या. शासकीय नोकरीत असलेल्या शिधापत्रिकाधारकांची नावे अंत्योदय योजनेत असल्याचे मोहिमेत आढळून आले. अशा नोकरदारांची शिधापत्रिका केशरी शिधापत्रिकेच्या वर्गवारीत टाकण्यात आली.

या शोध मोहिमेमुळे अंत्योदय योजनेच्या इष्टांकात गरजू व्यक्तींचा समावेश करणे शक्य झाले. त्यानुसार मेळघाटातील पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेत व प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट करण्यात आले. या सर्व प्रक्रियेमुळे मेळघाटातील पाड्यापाड्यांवरील तब्बल 4 हजार कुटुंबांचा नव्याने अंत्योदय योजनेत समावेश झाला. या सर्वांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांच्या मार्गदर्शनानुसार ही मोहिम महसूल विभाग, पुरवठा विभागातर्फे विविध विभागांच्या सहकार्याने व समन्वयाने राबविण्यात आली. 

 

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती