गृहनिर्मिती क्षेत्रात पर्यावरणपूरक विकास व्हावा - जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन

 


 

गृहनिर्मिती क्षेत्रात पर्यावरणपूरक विकास व्हावा

-         जिल्हाधिकारी पवनीत  कौर यांचे आवाहन

 

            अमरावती, दि. 11 :   शहरात गृहनिर्माणाची प्रक्रिया राबविताना पर्यावरणाची जपणूकही महत्वाची आहे. त्यामुळे ग्रीन बिल्डिंग,सौर ऊर्जेचा वापर या संकल्पना अंमलात आणून पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

 

            क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे हॉटेल ग्रँड महफिल येथील रुबी हॉलमध्ये प्रॉपर्टी एक्स्पो 2022’ चे उद्घाटन श्रीमती कौर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर, क्रेडाईचे अध्यक्ष संजय पर्वतकर, एचडीएफसी बँकेचे पंकज बर्नवाल, क्रेडाईच्या महिला समन्वयक अश्विनी देशपांडे, क्रेडाई संघटनेचे राज्य पदाधिकारी शैलेश वानखेडे, माजी अध्यक्ष राम महाजन उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, अमरावती शहराची स्मार्ट सिटी होण्याकडे वाटचाल होत असताना गृहविकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घातली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी पर्यावरणस्नेही इमारती आदी अभिनव संकल्पनांचा बांधकाम व्यावसायिकांनी वापर करावा. या संकल्पना अमरावतीसारख्या महत्वाच्या शहरात निश्चितपणे अंमलात आणल्या पाहिजेत.

 

अडचणींच्या निराकरणासाठी स्वतंत्र बैठक घेऊ

 

जनसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करत असताना गृहनिर्माणाशी संबंधित विविध शासकीय योजनांचाही त्यांना लाभ मिळवून द्यावा. बांधकाम व्यावसायिकांच्या मागण्या व अडचणींच्या निराकरणासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

पालिका आयुक्त श्री. आष्टीकर म्हणाले की, बांधकाम क्षेत्राशी संबंधित प्रक्रियेत सुलभता, सुसूत्रता, व सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येत आहे. प्रक्रियेत शक्य त्या बाबींसाठी सॉफ्टवेअर आदींचा वापर वाढविण्यात येत आहे.  

           

          श्री. पर्वतकर यांनी प्रास्ताविका केले.  निलेश ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. क्रेडाईचे सचिव रविंद्र बोडखे यांनी आभार मानले.  रविंद्र मिसाळ, सचिन वानखेडे, पंकज पाटील, अनिल विखे, रणजित देशमुख, दिलीप जयसिंघाणी, कमल मालवीय, रविंद्र महल्ले, मीनल देशमुख, क्रेडाईच्या महिला कार्यकारिणीच्या सदस्याआदी यावेळी उपस्थित होते.

000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती