शहरात स्वच्छतेची कामे नियोजनपूर्वक व सातत्याने राबवा राज्‍यमंत्री बच्‍चूभाऊ कडू यांनी घेतला महापालीका कामांचा आढावा

 








शहरात स्वच्छतेची कामे नियोजनपूर्वक व सातत्याने राबवा

राज्‍यमंत्री बच्‍चूभाऊ कडू यांनी घेतला महापालीका कामांचा आढावा

अमरावती, दि. 2 (विमाका) :  शहरात सार्वजनिक स्‍थळे व परिसराची स्वच्छता प्राधान्याने करण्यात यावी. कचरामुक्त परिसराचे महत्त्व पटवुन देण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. शासकीय रुग्णालये व सार्वजनिक परिसर पुर्णपणे कचरामुक्‍त करावा. संपुर्ण शहरात खुल्या जागेत जंतुनाशक फवारणी करण्यात यावी. स्‍वच्‍छतेसंदर्भात जबाबदार सेवांचे आवश्‍यक सर्व संपर्क क्रमांक नागरिकांपर्यंत पोहचविण्‍याची व्‍यवस्‍था करावी. स्वच्छतेबाबतचा नियोजनबध्‍द आराखडा तयार करावा. सफाई कामगारांना आवश्यक ती साधने उपलब्‍ध करुन देण्‍यात यावी असे निर्देश राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.

महानगरपालिकेतील सभागृहात आज विविध विषयाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पात्र लाभार्थ्यांना  तात्काळ घरकुल देण्यात यावे

        या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थ्‍यांच्या प्रस्तावावर तात्‍काळ कार्यवाही करुन त्यांना घरकुलाचा लाभ देण्‍याबाबत श्री. कडू यांनी संबंधितांना निर्देश दिले.

                दिव्यांगांचे बचत गट तयार करण्यात यावे

दिव्‍यांगांचे सर्वेक्षण करुन त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात यावी. दिव्‍यांगाच्या मानधनात आवश्यक ती वाढ करण्यात यावी. दिव्यांग व्यक्तींच्या माध्यमातुन तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांची सहजरित्या विक्री व्हावी व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी दिव्‍यांगांचे बचत गट तयार करण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले. सुरक्षा रक्षकाचे देयक नियमितपणे अदा करण्‍यात यावे. महिला बाल कल्‍याण विभागाच्‍यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवून त्याबाबत गरजू महिलांनी सहभागी होण्याबाबत  ‍जनजागृती करण्‍यात यावी असे श्री. कडू यांनी यावेळी सांगितले.

        महानगरपालिका क्षेत्रात आरोग्‍य व्‍यवस्‍था सुदृढ करावी. महानगरपालिकेचे  अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असलेले रुग्णालय निर्मिती करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा. गणू लेआऊट मधील हॉकर्स झोन बाबत स्‍थानिकांशी चर्चा करुनच निर्णय घ्‍यावा, असे निर्देश श्री. कडू यांनी संबंधितांना यावेळी दिले.

00000

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती