नांदगावपेठेत भूमिहीन बेघरांना जागा मालकी हक्कपत्र वाटप आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 




नांदगावपेठेत भूमिहीन बेघरांना जागा मालकी हक्कपत्र वाटप

आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. १ : जिल्ह्यातील एकही व्यक्ती बेघर राहू नये यासाठी आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

नांदगावपेठ येथे भूमिहीन बेघर लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेत घरकुलासाठी जागा मालकी हक्क वाटप पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले. पं स सभापती संगीताताई तायडे, उपसभापती बाळासाहेब देशमुख, जि. प. सदस्य भारतीताई गेडाम, सरपंच कविताताई डांगे, उपसरपंच मझहर खान, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात ७२ व्यक्तींना पट्टेवाटप करण्यात आले. यापुढेही सर्व पात्र व्यक्तींना घरे मिळवून देण्यात येतील, , असे पालकमंत्र्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, नांदगावपेठ येथे पाणीपुरवठ्यासाठी बोर धरणावरून पुरवठा योजना मंजूर असून, लवकरच कामाला गती मिळेल. नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात आले व होत आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली आहे.

नांदगावपेठेजवळील वनक्षेत्रात लवकरच ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात येणार आहे. संगमेश्वर, शादल बाबा दर्गा आदी ठिकाणी पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला. उर्वरित कामांनाही चालना देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

 

नांदगावपेठ येथील नागरी सुविधांची आवश्यकता लक्षात घेता येथे नगरपंचायत होणे आवश्यक आहे. तसा प्रस्ताव स्थानिक स्तरावरून द्यावा जेणेकरून नगरविकास विभागाकडून रस्ते, वीज, पाणी सुविधांसाठी मोठा निधी प्राप्त होऊ शकेल, अशीही सूचना पालकमंत्र्यांनी केली.

 

00000

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती