Thursday, March 3, 2022

जिल्हाधिका-यांना चांदूर बाजार तालुक्यात विविध ठिकाणी भेट

 






 

जिल्हाधिका-यांना चांदूर बाजार तालुक्यात विविध ठिकाणी भेट

‘पोकरा’च्या माध्यमातून विविध उपक्रमांना चालना द्यावी

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

अमरावती, दि. 3 : खराळा येथील बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेला कृषी यांत्रिकी अवजार बँकेचा उपक्रम उत्तम असून, अशा विविध उपक्रमांना पोकराच्या माध्यमातून चालना द्यावी , असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी बुधवारी चांदूर बाजार तालुक्याचा दौरा करून विविध ठिकाणांना भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. तहसीलदार धीरज स्थूल यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी खराळा येथे कृषी विभागांतर्गत पोकरा योजनेत बचत गटाने उभारलेल्या कृषी यांत्रिकी अवजार बँकेला भेट देऊन तेथील सदस्यांशी चर्चा केली. ग्रामीण भागात महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी बचत गटांतर्फे विविध उपक्रम अधिकाधिक प्रमाणावर राबविण्याची गरज आहे. असे उपक्रम सर्वदूर राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

चांदूर बाजार येथील ग्रामीण रूग्णालयातील पीएसए ऑक्सिजन प्लान्ट, तसेच नगरपरिषदेतर्फे उर्दू प्राथमिक शाळा व मराठी शाळेत  राबविण्यात आलेल्या वाचनालय व जिमखाना या नाविन्यपूर्ण कामांची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. ग्रामीण रूग्णालयातील रुग्णांशीही त्यांनी संवाद साधून विचारपूस केली.  

दौ-यादरम्यान जिल्हाधिकारी यांनी चांदूर बाजार तहसील कार्यालयाला भेट देऊन तेथील कामांचा आढावा घेतला. तहसील कार्यालयातील महसूली ग्रंथालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.

माधान येथील वृक्ष लागवड स्थळाला जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी भेट देऊन विविध प्रजातींच्या वृक्षसंपदेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी, तसेच नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

 

00000

 

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...