-          जिल्हाधिकारी पवनीत कौर

अमरावती, दि. 4 : जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी वेगवान पद्धतीचा अवलंब करावा. महापालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आदी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन मोहिम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.

राज्य शासनाने प्रथम मात्रेचे 90 टक्के लसीकरण व दुस-या मात्रेचे 70 टक्के लसीकरण व पॉझिटिविटी रेट दहा टक्क्यांहून कमी झालेल्या जिल्ह्यांना निर्बंधात शिथीलता दिली आहे. त्यात अमरावती जिल्ह्याचा समावेश नाही.  त्यामुळे जिल्ह्यात कोविड अनुरूप वर्तनाबाबतचे पूर्वीचे आदेश लागू आहेत. ही बाब स्पष्ट करणारा स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी आज जारी केला.

पूर्ण लसीकरणाची आवश्यकता

सर्व आस्थापनांच्या सर्व कर्मचा-यांचे पूर्ण  लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. घरपोच सेवा देणा-या कर्मचा-यांचे लसीकरण झालेले आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक वापर करणा-यांचे, तसेच मॉल, चित्रगृहे, नाट्यगृहे, पर्यटनस्थळे, उपाहारगृहे, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणे येथे जाणा-यांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक अथवा खासगी कार्यालयामध्ये किंवा आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी यांचा नागरिकांशी संबंध येतो, त्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. हीच बाब औद्योगिक समूहांनाही लागू राहील.

सामाजिक, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम, ज्यात लग्नसमारंभ व अंत्ययात्रा, तसेच स्नेहसंमेलने यांचा समावेश आहे अशा ठिकाणी उपस्थितांची संख्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के अथवा 200 यापैकी जी कमी असेल तेवढी ठेवता येईल.

इयत्ता पाचवी ते बारावी व पहिली ते चौथीचे वर्ग प्रत्यक्ष अध्ययन पद्धतीने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक व अंगणवाडीचे वर्गही प्रत्यक्ष भरवता येतील. ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे अध्यापन सुरू ठेवण्याचे नमूद आहे.  राज्यांतर्गत प्रवासावर निर्बंध नाहीत. आंतरराज्य प्रवास करावयाचा झाल्यास लसीकरण पूर्ण नसेल तर 72 तासांपूर्वीचे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक आहे.

सर्व प्रकारच्या बाजारपेठा, कॉम्प्लेक्स, चित्रपटगृहे, उपाहारगृहे, मद्यालये, क्रीडा संकुले, जिमखाने, व्यायामशाळा, स्पा, जलतरण तलाव, धार्मिक स्थळे, नाट्यगृहे, पर्यटनस्थळे, करमणूक उद्याने आदी त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. सर्व शासकीय व खासगी कार्यालये, उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू राहतील, असे आदेशात नमूद आहे.

00000

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती