‘लोकराज्य’च्या परिवर्तन कथा विशेषांकाचे जिल्हाधिका-यांचे हस्ते प्रकाशन



अमरावती, दि. 12 : शासनाच्या विविध योजना व निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम गेल्या 70 वर्षांपासून लोकराज्य मासिकाद्वारे होत आहे. महाराष्ट्रातील अनेकविध यशकथांचा समावेश असलेला ऑक्टोबरचा  महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा हा विशेषांकही उत्कृष्ट व संग्राह्य आहे, असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे सांगितले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दरमहा प्रकाशित होणाऱ्या 'लोकराज्य' मासिकाच्या ऑक्टोबर महिन्याच्या 'महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा' या विशेषांकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते. 
लोकराज्यच्या ऑक्टोबरच्या विशेषांकात महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमित्त परिवर्तन या सूत्रास अनुसरून महाराष्ट्रात होत असलेल्या विधायक परिवर्तनाची स्पंदने टिपण्यात आलेली आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन,संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींविषयी 'युगपुरुषाचा आदर्श' हा लेख लिहून महात्मा गांधीच्या मार्गदर्शक वाटचालींचा व विचारांची वाटचाल मांडून आपली आदरांजली व्यक्त केली आहे. 
या विशेषांकात राज्य शासनाच्या विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागात होत असलेल्या परिवर्तनाच्या यशकथा मांडण्यात आल्या आहेत. त्यात अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील बिजूधावडी येथे चालविल्या जाणा-या नीट प्रशिक्षण केंद्राची विजय राऊत यांनी लिहिलेली यशकथा समाविष्ट आहे. हा अंक सर्वत्र उपलब्ध असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.
00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती