गांधीजयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम पालकमंत्र्यांसह मान्यवरांकडून सुतकताई

                   








*विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
अमरावती, दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे आयोजित सुतकताई महोत्सवात पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी  सूतकताई करून महात्मा गांधीजी यांना आदरांजली वाहिली.
शहर व जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, शाळा- महाविद्यालये, पक्ष, संघटना, स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे कस्तुरबा सोलर खादी महिला समिती व शाश्वत विद्यालयाच्या सहकार्याने आयोजितसुतकताई महोत्सव लक्षणीय ठरला. 
जिल्हा उद्योग केंद्राच्या परिसरात सकाळी 8 पासूनच सुतकताईला सुरुवात झाली. नागरिक व विद्यार्थी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. पालकमंत्री श्री. पोटे पाटील, खासदार आनंदराव अडसूळ यांनी सकाळीच महोत्सवाला भेट दिली व महात्मा गांधींजी यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली.  त्यानंतर पालकमंत्र्यांनी गांधीचरख्यावर सुतकताई केली व महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांशी संवादही साधला.
                             नव्या पिढीला गांधीजींचे कार्य व सुतकताईची ओळख : पालकमंत्री
अमरावती ही वस्त्रोद्योगनगरी म्हणून सर्वदूर लौकिक मिळवत आहे. सोलर चरख्याद्वारे कापडनिर्मितीने या लौकिकात भर घातली असून, ग्रामोद्योग मंडळाचा आजचा सूतकताई महोत्सव उपक्रम अभिनव आहे. विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागामुळे या माध्यमातून महात्मा गांधी यांचे कार्य व सुतकताईचे महत्व नव्या पिढीच्या मनावर बिंबवले जाईल,  अशी प्रतिक्रिया  पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.   

   महोत्सवात हातचरखा, पेटीचरखा, अंबर चरखा असे अनेक प्रकारचे 50 चरखे ठेवण्यात आले. अनेक मान्यवर व विद्यार्थी स्वत: सूत कातून कापसापासून धागे कसे बनतात, याचा अनुभव घेतला. सूतकताईच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करण्याच्या संकल्पनेला कस्तुरबा समिती आणि शाश्वत शाळेकडून पाठबळ मिळाले, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी 
दिली.
हातचरखा ज्याला गांधीचरखा म्हणूनही ओळखले जाते, तो सर्वप्रथम वापरात आला. त्यानंतर महात्मा गांधीजींनी पेटीचरख्याची संकल्पना साकार केली जेणेकरून चरखा एका ठिकाणाहून दुसरीकडे पेटीबंद करुन सहज नेता येतो. त्यानंतर 1960 च्या सुमारास अंबर चरखा अस्तित्वात आला. ही आताच्या सोलर चरख्याची पहिली पायरी होती. नंतर चरख्याला  सौर ऊर्जेचे बळही मिळाले आणि सौर चरखा अस्तित्वात आला. आज त्यामुळे जिल्ह्यातील बचत गटांच्या माध्यमातून धागानिर्मिती व पुढे कस्तुरबा समितीच्या सहकार्याने वस्त्रनिर्मिती होत आहे. जिल्ह्यातील कष्टकरी महिलांना या उपक्रमातून रोजगार व व्यवसाय तर मिळालाच; शिवाय खेडोपाडी विणलेल्या या कापडाला आज महानगरांत मागणीही मिळाली आहे, असेही श्री. चेचरे यांनी सांगितले.  
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक नीलेश निकम, एमसीईडीचे विभागीय अधिकारी अभिराम डबीर श्री शिवाजी महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागाचे विद्यार्थी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
                         000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती