Friday, October 26, 2018

सैन्यदलाची भरती प्रक्रिया सुरळीत अफवांवर विश्वास ठेवू नका - कर्नल आर.एम. नेगी



अमरावती, दि. 27 :  भारतीय सैन्य दलातर्फे सैन्यभरती प्रक्रिया 3 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, आतापर्यंत सुमारे 15 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी चाचणीत भाग घेतला. चाचणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडत असून, उमेदवारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कर्नल आर. एम. नेगी यांनी येथे केले.
बुलडाणा वगळता नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी अमरावतीत भरती प्रक्रिया सुरु आहे.  सैन्यभरतीसाठी ऑनलाईन नोंदणीसह (ऑनलाईन ॲप्लिकेशन कम रजिस्ट्रेशन)अद्ययावत यंत्रणा उपलब्ध आहे. अत्यंत काटेकोर व पारदर्शीपणे हीप्रक्रिया पार पडते. तथापि, काही समाजकंटकांकडून उमेदवारांची फसवणूक झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. उमेदवारांनी कुठल्याही भूलथापांना  बळी पडू नये, असे आवाहन श्री. नेगी यांनी केले.
ते म्हणाले की, उमेदवारांची मोठी गर्दी लक्षात घेता सैन्यदलातर्फे काटेकोरपणे अविरत प्रक्रिया सुरु आहे. येथे  सुमारे दीडशे अधिकारी- कर्मचारी कार्यरत आहेत. अधिकारी श्रेणीतील 15 जणांसह 7- 8 डॉक्टरांचाही समावेश आहे. निवड अचूक व काटेकोर होण्यासाठी सैन्यदलाकडून अविश्रांत काम सुरु आहे.
                   प्रत्येक टप्प्यावर बायोमेट्रिक हजेरी
पारदर्शी प्रक्रियेसाठी चाचणीत उमेदवाराची प्रत्येक टप्प्यावर बायोमेट्रिक हजेरी घेतली जाते. विविध टप्प्यांवर वेगवेगळे अधिकारी चाचणी घेतात. उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जातात. शारीरीक मोजमाप चाचणी व धावणे आदी पात्रता आदी टप्प्यात तपासणी होते. चाचणीत कुठेही उणीव राहू नये म्हणून लेखी नोंदीसह फोटो नोंदीही जतन केल्या जातात. चाचणी प्रक्रिया घडत असतानाच प्रत्येक टप्प्यावरील नोंदीचे सॉफ्टवेअरमध्ये दस्तावेजीकरण होते. त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत काटेकोर व पारदर्शी असते.   

शारीरीक चाचणीत पात्र ठरलेल्यांना त्याचदिवशी त्याचठिकाणी लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र दिले जाते.
                                  27 जानेवारीला लेखी परीक्षा
शारीरक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दि. 27 जानेवारीला नागपूर येथे होणार आहे. जीडी क्लार्क, नर्सिंग असिस्टंट आदी पदांसाठी ही परीक्षा होत आहे. अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 30 व 1 तारखेला चाचणी होत आहे.
                                  नव्या दमाने तयारी करा – अपात्र उमेदवारांना आवाहन
आयुष्यात अनेक संधी येत असतात. त्यामुळे चाचणीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी निराश होता कामा नये. सैन्यदलाच्या माध्यमातून देशसेवेसाठी इतक्या मोठ्या संख्येने तरूण पुढे येत आहेत, हे पाहून आमचाही ऊर अभिमानाने भरून येतो. मात्र, चाचणी व निकषांवर सगळेच पात्र ठरत नाहीत. अशावेळी हिंमत हारून चालणार नाही. देशपातळीवर व राज्यपातळीवरही अनेक सुरक्षा दले कार्यरत आहेत. अनेक संधी आहेत. नव्या दमाने पुन्हा तयारीला लागा, असे आवाहन कर्नल श्री. नेगी यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...