मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करा - रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे

 














मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करा

-          रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे

 

* मातोश्री पाणंद रस्ते तसेच रोजगार हमी योजनेची विभागीय आढावा बैठक

 * प्रत्येक पंचायत समितीला मातोश्री भवन बांधणार

 

अमरावती दि. 26 : शेतमाल बाजारात पोहविण्यासाठी तसेच यंत्र सामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता आहे. यासाठी मातोश्री पाणंद रस्त्यांच्या कामाला गती देऊन मंजूर पाणंद रस्ते 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश रोजगार हमी योजना तसेच फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी आज येथे दिला.

नियोजन भवन येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे तसेच मातोश्री पाणंद रस्ता योजना अंमलबजावणीबाबत अमरावती विभागाची आढावा बैठक रोजगार हमी योजना मंत्री श्री. भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, विभागीय आयुक्त पियुष सिंह, नरेगा आयुक्त शांतनु गोयल,  अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर, अकोला जिल्हाधिकरी निमा अरोरा, यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे, बुलडाणा जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शेती व शेती पूरक उद्योगांचा विकास करण्यासाठी गूणवत्तापूर्ण पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून रोहयो मंत्री श्री. भूमरे म्हणाले की,  दिवसेंदिवस कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब आहे. शेतमाल बाजारात पोहचविण्यासाठी तसेच यंत्र सामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची गरज आहे. पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामासाठी आवश्यक साधनांची ने-आण करण्यासाठी  उपयोगात येतात. यासाठी मातोश्री पाणंद रस्ता योजनेचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळावा यासाठी पावसाळ्यापूर्वी म्हणजे 15 जूनपर्यंत पाणंद रस्त्यांचे काम पूर्ण करावे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध करुन द्या. ज्या गावात रोहयोंच्या कामांवर मजूरांचा प्रतिसाद चांगला आहे, तेथे आवश्यक काम हाती घ्या. जेणेकरुन मजूरांना रोजगार मिळेल व रोजगारामुळे मजूरांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक दुर्बल तसेच अकुशल कामगारांच्या हाताला काम मिळावे, हा रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

संपूर्ण राज्यात प्रत्येक पंचायत समितीत रोजगार सेवकाला कामकाजासाठी तसेच आसन व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी मातोश्री भवन स्थापन करण्यात येईल. राज्यात एक लाखांवर रस्त्यांची मागणी आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे करण्यावर भर द्या. याशिवाय शाळेची कुंपण भिंत, स्मशानभूमी अशा कामांसाठीही रोहयोच्या मजूरांची मदत घ्या. मातोश्री पाणंद रस्ते हा केवळ शेतकऱ्यांसाठी नसून संपूर्ण गावकऱ्यांना याचा फायदा होतो. यासाठी पाणंद रस्त्याची कामे गुणवत्तापूर्वक करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

अमरावती विभागातील रोहयो विभागाची जिल्हानिहाय स्थिती यावेळी जाणून घेण्यात आली. रोजगार हमी योजनेची सुरुवातच महाराष्ट्रातून झाली आहे. यामुळे रोहयोच्या कामांमध्ये महाराष्ट्र अव्वल व्हावा. रोजगार हमी योजनेंतर्गत मजूराने कामाची मागणी केल्यास त्याला 15 दिवसाच्या आत काम उपलब्ध करुन द्यावे. मजूरांसाठी पुरेसे जॉबकार्ड तयार होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधितांनी सातत्त्यपूर्ण प्रयत्न करावे. यासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी क्षेत्रनिहाय भेटी द्याव्यात. कामाचे अंदाजपत्रक लवकारात लवकर तयार व्हावे, यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा वापर करा. तांत्रिक तसेच प्रशासकीय मान्यता त्वरित मिळेल यासाठी प्रयत्न करावे, असे अपर मुख्य सचिव श्री. नंद कुमार यांनी  यावेळी सांगितले.

आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक तसेच तामिळनाडू येथे रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन दिला जातो. याच धर्तीवर राज्यातही रोहयोच्या कामामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे. या कामांना निधीची कमतरता भासल्यास शासनामार्फत त्वरित निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. गावाला रस्ता उपलब्ध झाल्यास गावाचा विकास आपसुकच होतो. मातोश्री पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे गावकऱ्यांनाही फायदा होणार असल्यामुळे ती कामे त्वरित पूर्ण करुन तसा अहवाल सादर करावा. तसेच प्राप्त मनुष्य दिवस निर्मितीचे लक्षांक जिल्ह्यांनी यंत्रणानिहाय व तालुकानिहाय वाटप करुन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करावे, असे निर्देश श्री. नंद कुमार यांनी यावेळी दिले.

 

 विभागीय आयुक्त श्री. पियुष सिंह यांनी अमरावती विभागात मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी सुत्रसंचालन केले. रोहयो कामामध्ये उत्तम कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अमरावती विभागाचे सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती