उष्णतेची लाट शुक्रवारपर्यंत राहण्याची शक्यता

नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन

 

अमरावती, दि. 5 : भारतीय हवामान विभाग व नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये शुक्रवारपर्यंत उष्णतेची लाट राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

हवामान खात्याच्या नोंदीनुसार, अकोला येथे सोमवारी 44. 1 अंश से. तापमान नोंदवले गेले. ते राज्यातील सर्वोच्च कमाल तापमान होते. अमरावती येथे सोमवारी कमाल तापमान 43 अं. से., तर किमान तापमान 23. 7 अं. से. नोंदवले गेले. पुढील चार ते पाच दिवस उन्हाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याबाबत आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे  करण्यात आले आहे.                     

 

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी

 

तीव्र उन्हात मुख्यत: दुपारी 12 ते 3 या दरम्यान बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पित राहावे. शक्यतो हलक्या रंगाच्या सुती कपडयांचा वापर करावा. गडद, घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे. घराबाहेर पडताना छत्री, टोपी, गॉगलचा वापर करावा. मद्य, चहा, कॉफी, व शीतपेये  व शिळे अन्न खाणे टाळावे. उन्हात काम करत असताना आपला चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावी. शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात काम करताना पुरेसे पाणी प्यावे, तसेच प्रखर सूर्य प्रकाश असताना दुपारच्या वेळी काम करणे टाळावे

 

             चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरित डॉक्टरकडे जावे. ओ. आर. एस., लस्सी, ताक, लिंबू पाणी इत्यादी घरगुती शीतपेयांचे भरपूर सेवन करावे. प्राण्यांना सावलीत ठेवून त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे.

 

उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडल्यास

 

        अशा व्यक्तीला एखाद्या थंड जागी ठेवा. शरीराचे तापमान खाली आणण्याचा प्रयत्न करा. ओल्या कपड्याने त्याला पुसत रहा. डोक्यावर थंड पाणी टाका. व्यक्तीला ओ. आर.एस.,लस्सी, ताक, लिंबू पाणी इत्यादी घरगुती शीतपेय द्यावे. अशा व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. कारण उष्माघात घातक ठरू शकतो. , असे आवाहन आरोग्य  विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

            

 

 

पशुधनाची काळजी घ्यावी

 

पशुधनाची काळजी घेण्याबाबत जिल्हा कृषी हवामान केंद्रामार्फत सूचना जारी करण्यात आल्या आहेत.वाढत्या तापमानात पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जनावरांना थंड व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. बैल व पशुधनाकडून सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान काम करणे टाळावे. उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठाच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. शेड सिमेंट किंवा पत्र्याचे असल्यास त्यास पांढरा रंग द्यावा. शक्य असल्यास जनावरांच्या शेड मध्ये पंखे किंवा फोगर्सचा वापर करावा.

 

जनावरांच्या आहारामध्ये हिरवा चारा, प्रथिनयुक्त, खनिज मिश्रण व मीठ युक्त खाद्य द्यावे. जनावरांना सकाळी किंवा संध्याकाळी चरावयास सोडावे. कुक्कुट पालन शेडमध्ये पडद्याचा वापर करावा व शेडमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

00000

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती