वैयक्तिक लाभाच्या योजनांचा अधिकाधिक शेतकरी बांधवांना मिळवून द्यावा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 








पोकरा योजनेत ब्राम्हणवाडा भगत येथे कृषी अवजार बँकेचा शुभारंभ

वैयक्तिक लाभाच्या योजनांचा अधिकाधिक शेतकरी बांधवांना मिळवून द्यावा

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. १७ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी अनेक उत्तमोत्तम उपक्रमाची तरतूद आहे. त्याचा लाभ अधिकाधिक शेतकरी बांधवांना मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज ब्राम्हणवाडा भगत येथे दिले.  

ब्राम्हणवाडा भगत येथे जागतिक बँक व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात शेती उपयोगी साहित्याचे वाटप, युवा शेतकरी बचत गट व कृष्णाई महिला स्वयंसहायता समूहाच्या अवजार बँकेचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि.प. माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी  अनिल खर्चान आदी उपस्थित होते.

पोकरा योजना जिल्ह्यातील ५३२ गावांत राबवली जाते. या योजनेत वैयक्तिक लाभाच्या अनेक उत्तम योजना आहेत. ठिबक, तुषार संचाप्रमाणेच शेडनेट हाऊस, पॉलिग्रीनहाऊससारख्या चांगले अनुदान असलेल्या योजनांचाही लाभ शेतकरी बांधवांना मिळाला पाहिजे. त्यासाठी शेतकरी बांधवांना वैयक्तिक योजनांचाही लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.  समाजातील शेवटच्या माणसापर्यंत योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्र्यांकडून ट्रॅक्टरचे सारथ्य

योजनेद्वारे शेतकरी बांधवांसाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याची प्रथम चाचणी यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवून घेतली. ट्रॅक्टरचे स्टेरिंग हाती घेत पालकमंत्र्यांनी अवजार बँकेच्या आवारात ट्रॅक्टर चालवला. कृषी क्षेत्रात आवश्यक तंत्रज्ञान, अद्ययावत साधने उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.  

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती