जलसंवर्धनासाठी जलशक्ती अभियान सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 




जलसंवर्धनासाठी जलशक्ती अभियान

सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे

-       जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 1 : जिल्ह्यात जल संवर्धन व जलसुरक्षेसाठी महाराष्ट्र जलशक्ती अभियान राबविण्यात येत असून, त्याच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून ही मोहिम यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

        बचतभवनात जलशक्ती अभियान कॅन द रेन -2022 कार्यक्रम जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांच्यासह जलसंधारण विभागाचे अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

                   विशेष ग्रामसभा होणार

जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, जलशक्ती अभियानात सर्व जलसाठ्यांचे नोंदणीकरण करावयाचे असून, गावपातळीवर जलसंधारण आराखडे तयार करण्यात येत आहेत. या आराखड्यांच्या आधारे वार्षिक कृती योजना तयार करण्यात येत असून, या कामांना प्राधान्य देण्यात यावे. सर्व शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवावी. जिल्ह्यात 29 मार्चला विशेष ग्रामसभा घ्यावयाची असून, प्रत्येकाने जल शपथ घ्यावी. विशेष ग्रामसभेदरम्यान विविध उद्दिष्टे आणि कृती मुद्द्यांचे सरपंच महोदयांमार्फत वाचन करण्यात येणार आहे. जलशक्ती केंद्र स्थापन करण्यात येत असून, ते समन्वय आणि माहिती, शिक्षण व प्रसाराचा महत्वाचा स्त्रोत बनणार आहे.  

पाण्याचा प्रत्येक थेंब जतन करणे, विद्यमान संरचनेची पाणी क्षमता पुनर्संचयित करणे, पुनर्वापर व पुनर्भरण, सघन वृक्षारोपण, मृद ओलावा संवर्धनाबरोबरच प्रत्येक जलसाठ्याची जिओ टॅगिंगसह महसूल अभिलेखातही नोंद होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिका-यांनी जलशपथेचे वाचन करून उपस्थितांना शपथ दिली.

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती