जिल्ह्यात 25 एप्रिलला राष्ट्रीय जंतनाशक दिन साडेसहा लाख बालक, विद्यार्थ्यांना देणार जंतनाशक गोळ्या

 





जिल्ह्यात 25 एप्रिलला राष्ट्रीय जंतनाशक दिन

साडेसहा लाख बालक, विद्यार्थ्यांना देणार जंतनाशक गोळ्या

 

अमरावती, दि. १९ : जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन 25 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असून, वय एक ते 19 वर्षे या वयोगटातील मुलांमुलींना जंतनाशकाची गोळी देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे साडेसहा लाख बालके व टीनएजर्स यांना ही गोळी देण्यात येणार असून, ही मोहिम सर्व विभागांनी समन्वय ठेवून यशस्वी करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी आज येथे दिले.

 

मोहिमेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. जि. प. महिला व बालविकास अधिकारी कैलास घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत घोडाम, शिक्षणाधिकारी कार्यालयाचे अनिल कोल्हे, विस्तार अधिकारी कविता पवार, अ. ना. रामटेके, श्रीमती सी. एस. लोखंडे, ज्ञानेश्वर राठोड आदी उपस्थित होते.

 

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम यापूर्वी सप्टेंबरमध्ये घेण्यात आली. बालक, टीनएजर्समध्ये जंतांमुळे ॲनिमिया होण्याचा संभव असतो. त्यामुळे ही प्रभावी गोळी विनामूल्य देऊन त्यांचे आरोग्य चांगले राखणे हा मोहिमेचा उद्देश आहे. संस्था स्तरावर 1 ते 19 वयोगटासाठी शिक्षण विभागाच्या सहकार्याने शाळांमधून मोहिम घेण्यात येईल. शाळेत न जाणा-या सहा वर्षांखालील व एका वर्षांवरील मुलांना गोळी देण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचा मोहिमेत समावेश आहे. त्याचप्रमाणे, दि. 25 एप्रिल रोजी कुणी विद्यार्थी अनुपस्थित असतील तर त्यांना गोळी देण्यासाठी 29 तारखेला मॉपअप प्रोग्राम, तसेच दि. 2 मेपर्यंत आशा सेविकांमार्फत मोहिम चालविण्यात येईल, असे श्री. बिजवल यांनी सांगितले.

 

गिळू नका; चघळा

 

माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. कारंजेकर म्हणाले की, जिल्ह्याला सुमारे साडेसहा लाखांहून अधिक गोळ्या प्राप्त असून, शाळांना वाटप होत आहे. ही गोळी शिक्षकांसमक्ष विद्यार्थ्यांनी शाळेतच घ्यायची आहे. ही गोळी विद्यार्थ्यांनी गिळावयाची नाही, तर चघळायची आहे. गोळी सुरक्षित व चविष्ट आहे. तथापि, क्वचितप्रसंगी मुलामध्ये जंतबाधा जास्त असेल तर चक्कर येण्यासारखे प्रकार घडू शकतात. अशावेळी शिक्षकांनी त्यांना तत्काळ दवाखान्यात न्यावे. याबाबत 104 क्रमांकावरही संपर्क करता येईल. त्याशिवाय, नजिकच्या आरोग्य केंद्रांचे क्रमांक शाळेत दर्शनी भागात लावण्याचीही सूचना दिली आहे.

वय 1 ते 3 वयोगटातील जी मुले चावू शकत नाहीत, त्यांना ही गोळी पाण्यात विरघळवून देता येईल.

ही काळजी घ्यावी

आजारी बालकाला गोळी देऊ नये. एका वर्षाहून कमी वय असलेल्या मुलाला गोळी देऊ नये. गोळी घेतल्यावर कुणी उलटी केली तर पुन्हा गोळी देऊ नये. गोळी घेण्यापूर्वी मुलांनी जेवण केलेले असले तर त्रास होत नाही.  ही गोळी जंतांना दुबळे करते. गोळी घेतल्यानंतर मुलांनी चांगले फायबरयुक्त जेवण घेतल्यास जंत असतील तर विष्ठेद्वारे निघून जातात. मुलांचे आरोग्य सुधारते, अशी माहिती डॉ. घोडाम यांनी यावेळी दिली.

दिल्ली, मुंबई, पुणे येथे काही प्रमाणात कोविड रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोविड लसीकरणाला गती द्यावी. पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी शाळांमध्ये पडताळा घ्यावा व अजूनही लसीकरण न झालेल्यांचे लसीकरण करून घेण्याच्या सूचनाही श्री. बिजवल यांनी दिल्या.  

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती