लोकसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी विविध उपक्रम - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 










दिव्यांग अधिकारिता शिबिर व सहायक उपकरण वितरण सोहळा

सुमारे १ हजार ४०० दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप

लोकसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी विविध उपक्रम

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

       अमरावती, दि. ९ : राजकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक कार्याला प्राधान्य देत विविध जनहिताच्या उपक्रमांद्वारे  लोकसेवेचा वारसा पुढे नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज मोझरी येथे केले.

      श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था व दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या सहकार्याने स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंती कार्यक्रमांतर्गत दिव्यांग अधिकारिता शिबिर व सहायक उपकरण वितरण सोहळा मोझरी येथील रावसाहेब ठाकूर विद्यानिकेतन येथे झाला. त्यात १ हजार ४०० दिव्यांगाना विविध उपकरणे व साहित्य वाटप झाले. माजी जि. प. सभापती पूजा आमले, पं. स. सभापती शिल्पा हांडे, तहसीलदार वैभव फरतारे, डॉ. अंजली ठाकरे आदी उपस्थित होते.

        शिबिरात दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व साहित्य साधने, मोटाराईज्ड ट्रायसिकल, तीनचाकी सायकल, व्हिल चेअर, कुबडी जोडी, स्मार्ट फोन, स्मार्टकेण, एमआर किट, ब्रेल किट, सिटी चेअर, ऑटोबाईक जयपूर फुट, कैलिफर इत्यादी साहित्य सुमारे २ कोटी रुपयांच्या साहित्याचे यावेळी वाटप करण्यात आले.

      पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम हाती घेतला. राजकारण हे राजकारणासाठी करायचे नाही, तर समाजकारणासाठी करायचे या विचारातून सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. लोकसेवेचे हे व्रत जपताना यापुढेही अनेकविध उपक्रमांना चालना देण्यात येईल.

 

            त्या पुढे म्हणाल्या की, ही भूमी राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी आहे, त्यांच्या संतवचनातून आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे. स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांनीही आम्हाला जनसेवेचे बाळकडू दिले आहे. आपला जन्म देशसेवेसाठी झाला आहे, असे मनावर बिंबवले आहे. म्हणूनच राजकारणापलीकडे जाणून जनतेच्या हिताचे समाजकारण करण्यात आम्ही नेहमीच अग्रेसर असतो. रामचंद्र युवक कल्याण संस्थेने आपल्या समाजोपयोगी कार्यातून आपले काम अविरतपणे सुरू ठेवले आहे यांचा अभिमान वाटतो. असे ही ऍड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. 

या कार्यक्रमास रामचंद्र युवक कल्याण संस्थेचे पदाधिकारी आणि अमरावती जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती