Monday, July 31, 2023

ग्रामीण भागात कलम 37 (1) व (3) लागू

ग्रामीण भागात  कलम 37 (1)  व (3) लागू

            अमरावती, दि. 31 :  जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती  यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून   दि. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी  विवेक घोडके  यांनी कळविले आहे.

00000 

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.7) लोकशाही दिनाचे आयोजन

 


जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.7) लोकशाही दिनाचे आयोजन

          अमरावती, दि. 31 : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन ऑगस्ट महिण्याचे पहिल्या सोमवारी म्हणजे दि. 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 1 वाजता आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी शासकीय कार्यालयाच्या निगडित तक्रारी, गाऱ्हाणी संदर्भातील प्रकरणे, निवेदन लेखी स्वरुपात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे.

00000

Sunday, July 30, 2023

वनविभाग भरती परीक्षेबाबत समाज माध्यमांवरील संदेश चूकीचा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे वन विभागाचे आवाहन

वनविभाग भरती परीक्षेबाबत समाज माध्यमांवरील संदेश चूकीचा;

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे वन विभागाचे आवाहन

अमरावतीदि. 30 -  वन विभागामार्फत भरती प्रक्रिया दि. 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान विविध परिक्षा केंद्रावर लेखी परिक्षाचे आयोजन करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेतील वनरक्षक पदाच्या परिक्षेसाठी पेपर लिक करुन खाजगी केंद्रामध्ये ज्याची परिक्षा आहेत्यांना पेपरमध्ये मदत करण्यासंदर्भातील संदेश विविध समाज माध्यमांवर प्रसारीत होत आहे.

 खात्याकडून घेण्यात येत असलेली परिक्षा ही टीसीएस यांचे माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. त्यामुळे समाज माध्यमावर प्रसारीत होत असलेले संदेश आणि अफवांवर परिक्षार्थींने/नागरिकांनी विश्वास ठेवू नयेअसे आवाहन अमरावती वन विभागाचे उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांनी केले आहे.

             प्रसारित होत असलेल्या संदेशासंदर्भात पोलीस विभागाकडे तक्रार करण्यात आले आहे. तसेच या संदर्भातील परिक्षार्थींना कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास पुराव्यानिशा या कार्यालयाकडे किंवा पोलिस विभागाशी संपर्क साधावाअसेही आवाहन वन विभागाव्दारे करण्यात आले आहे.

000000


Friday, July 28, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण उद्योगांची उभारणी करा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 















ग्रामीण भागाच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण उद्योगांची उभारणी करा

-    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 

अमरावती, दि. 28 : आदिवासी, ग्रामीण व आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी उद्योगपूरक व्यवसायांची निर्मिती आवश्यक आहे. यासाठी अशा भागात नाविण्यपूर्ण उद्योगांच्या उभारणीसाठी उद्योग समूहाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. 

 

        एमआयडीसी येथील ग्रीन फॅब सोलर खादी प्रोसेसिंग क्लस्टरच्या सोलर चरखा कॉमन फॅसिलिटी सेंटरच्या टेक्सटाईल डिजिटल प्रिंटिंग युनिटचे उद्घाटन श्री. गडकरी यांच्या हस्ते  झाले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, खादी ग्राम उद्योगाचे संचालक रविंद्र साठे, एमएसएमईचे संचालक पी.एम.पार्लेकर, सहसंचालक सतिश शेळके, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यान्थन, अमरावती इंड्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर, प्रदीप चेचरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

        केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, आपला देश शेती प्रधान आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. यामुळे शेतकऱ्यांसाठी शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायांची आवश्यकता आहे. सोलर चरखा समूह कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगला प्रयत्न होत असून अशा प्रकारचे प्रकल्प ग्रामीण भागात होण्यासाठी येथील उद्योग समूहाने पुढाकार घ्यावा. देशाच्या आर्थिक विकासात उत्पादन क्षेत्राचा वाटा हा सेवा क्षेत्रापेक्षा फारच कमी आहे. उत्पादन क्षेत्राचा विस्तार केला तरच देश आत्मनिर्भर होईल. ग्रामीण, आदिवासी व आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी खादी ग्राम उद्योग तसेच लघु व सुक्ष्म उद्योगांनी पुढाकार घ्यावा. तसेच उद्योजकांना ग्रामीण भागात उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन यावेळी केले.

 

        विदर्भात संत्री, कापूस तसेच सोयाबीन पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. परंतु उत्पादित मालांला बाजारपेठ व रास्त भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावरच उत्पादित मालावर प्रक्रिया व बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवश्यक आहे. सोलर चरखा समूह कार्यक्रम हा नाविण्यपूर्ण पथदर्शी प्रकल्प असून अशाप्रकारचे प्रकल्प विकासात महत्वाची भूमिका निभावतील. भौगोलिक स्थितीनुसार उत्पादनाला चालना मिळणाऱ्या संकल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे. संशोधनाचा वापर करुन ऑरगॅनिक कापड निर्मिती करा. याला ग्राहकांची मोठी मागणी आहे. त्यांच्या आवडीनुसार उत्पादन निर्माण करा. ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरातींचेही महत्त्व आहे. यासाठी खादी ग्राम उद्योग तसेच लघु व सुक्ष्म उद्योग विभागाने त्यांना सहकार्य करावे, असेही श्री. गडकरी यावेळी म्हणाले.

 

        कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्रदीप चेचरे यांनी सामूहिक सुविधा केंद्राच्या उभारणीसंदर्भातील माहिती दिली. समूहामध्ये जिल्ह्यातील 21 गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सोलर चरखे वाटप करुन सूत कताई करण्यात आले. त्यानंतर त्यावर प्रक्रियाकरुन कापड निर्मिती करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 300 पेक्षा जास्त महिलांना रोजगार प्राप्त होत असून त्यांच्या आर्थिक जीवनमान उंचावणास  मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रकल्पासंदर्भातील कॉपी बुक टेबलचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. त्यानंतर श्री. गडकरी यांच्या हस्ते कुटीर शॉप ॲपचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्रद्धा पांडे यांनी तर आभार विजय सिरसाठ यांनी मानले.

 

00000

शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 









गोकुलम गोरक्षण संस्थेच्या चिकित्सालयाचे उद्घाटन

शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करा

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 

अमरावती, दि. 28: शेतकी उत्पादनासोबतच पूरक व्यवसायावर भर द्या. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करुन गुरांच्या चाऱ्यांचे उत्पादन घ्या. जेणेकरुन वर्षभर पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध होईल. महागड्या पशुखाद्याला पर्याय म्हणून मका, सोयाबिन, तांदुळाच्या चुरीपासून पशु खाद्य निर्माण करण्यावर भर द्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

नांदुरा बु. येथील गोकुलम गोरक्षण संस्थेच्या अत्याधुनिक पशु चिकित्सालय, पशु मोबाईल ॲम्बुलन्स तसेच पक्षीघराचे लोकार्पण श्री. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

          खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्यासह जीव जंतु मुंबई कल्याण मंडळाचे सदस्य गिरीशभाई शहा, श्रीमद राजचंद्र जीवदया ट्रस्टचे रतनभाई लुनावत, आदीजीन युवक चॅरिटेबल ट्रस्टचे जयेशभाई शहा, मेहता चॅरिटेबल ट्रस्टचे विजयभाई वोरा, भरतभाई मेहता, गोसेवा आयोग महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, डॉ. हेमंत मुरके, डॉ. करुणा मुरके, विनय बोथरा, विजय बोथरा, अशोक मुंधडा आदी मान्यवर उपस्थित होते.

          श्री. गडकरी म्हणाले की, गोकुलम गोरक्षण संस्थेत वृध्द, रुग्ण, भाकड, निराश्रीत, अपघातग्रस्त, गोवंशाची व प्राण्यांची सेवा करण्यात येते. अशी भूतदया संस्थेमार्फत करण्यात येते, ही आनंदाची बाब आहे. प्राण्यांची सेवा करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. शेतीपूरक व्यवसायासाठी गोवंश वृध्दी आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे पूरक व्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी मदर डेअरीची स्थापना करण्यात आली. मदर डेअरीच्या दुग्धज उत्पादनासह संत्रा बर्फीलाही चांगली मागणी आहे. त्याला विदर्भात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्याचप्रमाणे गाईच्या शेणापासून पेंटची निर्मिती करण्यात येते. अशा व्यवसायांची वृध्दी होणे आवश्यक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीपूरक व्यवसाय वाढविल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात निश्चितच वाढ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

          देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन करा. 20 लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या देशी गाईंचे संवर्धन करा. त्यामध्ये कृत्रिम रेतन पध्दतीने सॉर्टेड सिमेन (लिंग निर्धारित वीर्यमात्रा) वापरुन चांगल्या दुधारु गाईंची निर्मिती करावी. या तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी वेळात जास्तीत जास्त मादी वासरे जन्माला येऊ शकतात. सोबतच भ्रूण प्रत्यारोपण या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगल्या प्रतींच्या गाईंची निर्मिती करा. या माध्यमातून विदर्भामध्ये प्रत्येक दिवशी 30 लक्ष लिटर दुधाची निर्मिती व्हावी. त्याचे नियोजन मदर डेअरीमार्फत करण्यात यावे, असेही ते यावेळी म्हणाले. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. हेमंत मुरके यांनी गोकुलम गोरक्षण संस्थेबाबत माहिती दिली. संस्थेची स्थापना 2013 ला झाली असून चाळीस एकर परिसरामध्ये याचा विस्तार झाला आहे. सध्या गोरक्षण संस्थेमध्ये 278 आजारी गोवंशाचे पालन पोषण करण्यात येत आहे.  परिसरातील रुग्ण व अपघातग्रस्त प्राणी व पशुपक्ष्यांवर नि:शुल्क औषधोपचार, चिकित्सा, शस्त्रक्रिया करणारी ही राज्यातील एकमेव संस्था आहे. गोकुलम मध्ये 2 पशुरुग्णवाहिका उपलब्ध असून परिसरातील अपघातग्रस्त पशुंसाठी चोवीस तास नि:शुल्क सेवा पुरविण्यात येते.  मागील 8 वर्षात 31 हजार 586 पशुपक्षी व प्राण्यांवर उपचार येथे करण्यात आले आहे. त्यासाठी पुर्णवेळ 4 पशुवैद्य नेमले असून 10 पेक्षा जास्त सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकारी सेवाव्रती नि:शुल्क सेवा देतात. तसेच संस्थेत गोवंशाच्या शेण आणि गोमुत्रापासून पंचगव्य उत्पादनाची निर्मिती व विक्री करण्यात येते. गोआधारित शेतीसाठी गांडूळ खत, कीटकनियंत्रक तयार करण्यात येते. तसेच गोकुलमच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येतात.

कार्यक्रमाचे संचालन पंडित देवदत्त शर्मा यांनी तर आभार डॉ. करुणा मुरके यांनी मानले.

0000

 

 

गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्या - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 















विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम

गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्या

-     केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 

अमरावती, दि. 28 : शंभर वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेची एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याकडे वाटचाल होत आहे.  तंत्रज्ञानात होणाऱ्या नवनवीन अविष्कारांचा वेध घेवून संस्थेने गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

           विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेचा शताब्दी महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संस्थेच्या केशवराव भोसले सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, माजी आमदार बी.टी. देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यान्थन, महानगरपालिका आयुक्त देविदास पवार, उच्च शिक्षण सहसंचालक नलिनी टेंभेकर, व्हीएमव्ही संस्थेच्या संचालिका डॉ. अंजली देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होवून शतकोत्तर वाटचाल सुरु झाली आहे. संस्थेचा आजवरचा इतिहास देदीप्यमान आहे. अमरावती परिसर ही संताची भूमी आहे. येथे संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज तसेच शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या सानिध्याने ही भूमी पावन झाली आहे. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे अनेक महापुरुष या महाविद्यालयात घडले. विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी अनेक मोठी व्यक्तिमत्त्व येथे घडली. या संस्थेतील विद्यार्थ्यांनी देशभर आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले आहे. विद्यार्थी घडविण्यामध्ये शिक्षण संस्थांची भूमिका महत्‍त्वपूर्ण आहे. शिक्षणाचे स्वरुप सर्वस्पर्शी असावे. त्याचे सार्वत्रिकरण होणे आवश्यक आहे. ज्ञान ही कोणाची मुक्तेदारी नसून ज्ञान मिळवणे प्रत्येकाचा अधिकार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणले असून ते लवचिक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिकता येईल. भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय, अभियंत्रिकी शिक्षण घेता येणार आहे. जगात भारताची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. जागतिकीकरणाच्या युगात रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी नवीन अभ्यासक्रमांची सुरवात करण्यात येत असल्याचे श्री. गडकरी म्हणाले.

            विदर्भातील कापूस, सोयाबीन, तूर, संत्री यांचे एकरी उत्पादन वाढावे, यासाठी नवीन वाण निर्मिती करण्यासाठी यावर संशोधन व्हावे. या परिसरात मोठया प्रमाणात खनिजे आहेत. त्यावर संशोधन करणासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. भविष्यकालीन तंत्रज्ञानाची पाऊले ओळखून शिक्षण संस्थानी अभ्यासक्रमात वैविध्य आणावे. येथील भौगोलिक स्थितीनुसार उत्पादनाला चालना मिळणाऱ्या संकल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे. खारपाणपट्ट्यात झिंग्यांचे उत्पादन घेतल्यास या पूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होईल. इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध आहेत. त्यांचा वापर वाढवा. त्यामुळे इंधनाचा एक सशक्त व परवडणारा पर्याय उभा राहील. बांबूपासून इथेनॉल निर्मिती, कचऱ्यापासून रस्त्यांची निर्मिती, अशुद्ध पाण्याचा पुर्नवापर अशा विविध संकल्पनातून उत्पन्न वाढ व रोजगार निर्मिती होत आहे.  अशा बाबींचे अनुकरण करणे काळजी गरज असल्याचे श्री. गडकरी म्हणाले. 

             कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेच्या संचालिका डॉ.अंजली देशमुख यांनी  संस्थेच्या निर्मितीपासून आजवर झालेल्या प्रगतीची माहिती दिली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या वऱ्हाडाचे भूषण ठरलेल्या ब्रिटिश काळातील किंग एडवर्ड कॉलेज व सध्याच्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला आज शंभर वर्षे पूर्ण झाली असून 101 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ही शासकीय संस्था मागील शंभर वर्षापासून मध्य भारतातील एक नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून आपले स्थान अबाधित राखू शकली आहे. या महाविद्यालयाची इमारत भव्य दगडी स्वरुपात बांधलेली असून तब्बल 168 एकरच्या परिसरात वसतिगृह, प्रशस्त निवासस्थाने भव्य प्रांगण अशी ही वास्तू आहे.

या संस्थेची सुरवात लोक वर्गणीतून झाली. या संस्थेला सन 2021 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला. संस्थेत आज सुमारे चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने या संस्थेला 21 विषयात आचार्य (पीएचडी) पदवीसाठी संशोधन केंद्र म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आलेल्या स्मारकाच्या कोनशीलेचे श्री. गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच ‘संस्थेच्या पाऊलखुणा’ या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंजुषा वाठ यांनी तर आभार डॉ. साधना कोल्हेकर यांनी मानले.

00000

 

 

Thursday, July 27, 2023

शिकस्त शाळा इमारतीची माहिती आकस्मित कक्षाला कळवा;शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन

 शिकस्त शाळा इमारतीची माहिती आकस्मित कक्षाला कळवा;शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन

 

            अमरावती, दि. 27 : पळझड व बाध‍ित झालेल्या शाळांची माहिती देण्यासाठी आकस्मिक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतंर्गत प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयाच्या धोकादायक व शिकस्त इमारतीची माहिती आकस्मित कक्षाला कळवा, असे आवाहन जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केले आहे.

            जिल्हा परिषदेतंर्गत असलेल्या शाळा, इमारती धोकादायक स्थितीत असतील, अशा वर्ग खोल्याचे पर्यायी सुस्थितीत ठिकाणी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांना दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हापरिषदेतील शिकस्त व धोकादायक  शाळेच्या वर्ग खोल्या पर्यायी ठिकाणी म्हणजेच गावातील समाज मंदिर, अंगणवाडी केंद्र, मंदिर संस्थान किंवा सुस्थितीत असलेल्या खाजगी इमारतीत  व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषदेमध्ये आकस्मिक  कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्ह्यातील धोकादायक व शिकस्त शाळा, इमारतीबाबत सूचना असल्यास किंवा मदतीची गरज असल्यास दुरध्वनी क्रमांक 0721-2666262, 2662926 वर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

00000

सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण; इच्छुक लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

 सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण;

 इच्छुक लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

       अमरावती, दि. 27 : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत कौशल्य विकास सोसायटी मार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षण व अभ्यासक्रम मागणी नोंदविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त अ. स. ठाकरे यांनी केले आहे.

          सारथी कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, विकास सोयासटी मार्फत उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. सारथीच्या लक्षीत गटातील (मराठा, कुणबी मराठा, व कुणबी-मराठा) उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील 800 उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यामधील स्कील इंडिया पोर्टलवरील विविध सेक्टरमधील अभ्यासक्रमासाठी 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार, ट्रेनिंग सेंटर (टीपी-टीसी) यांना सोसायटीमार्फत विह‍ित प्रक्रियेचा अवलंब करून उद्दिष्टे वितर‍ित करुन प्रशिक्षण देण्यात येईल.यासाठी सारथीच्यालक्षीत गटातील उमेदवारांमार्फत कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम मागणी नोंदव‍िण्यासाठी नोंदणी फार्म तयार करण्यात आला आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी

 https://Kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi या लिंकवर भेट देऊन आपले नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिद जवळ, बस स्टॅन्ड रोड, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

खादी व ग्रामोद्योग मंडळ;मध केंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 खादी व ग्रामोद्योग मंडळ;मध केंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

            अमरावती, दि.27: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली  आहे. या योजनेमध्ये मध उद्योगासाठी मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणुक, शासनाची हमी भावाने मधखरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धन इत्यादी बाबी लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.  इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी मध केंद्र योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

 

वैयक्तिक मधपाळ

मध केंद्र योजनेनुसार वैयक्तिक मधपाळ अर्जदार हा साक्षर असावा. तसेच त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.  स्वत:ची शेती असल्यास त्या अर्जदारास प्राधान्य देण्यात येईल.

 

केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ

केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ व्यक्ती किमान दहावी उत्तीर्ण असावा. त्याचे वय 21 वर्षापेक्षा जास्त   असावे. अशा व्यक्तीच्या नावे किमान एकर जमीन अथवा त्या व्यक्तींच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेत-जमीन किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेत जमीन असावी. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळाकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनासंबंधी इच्छुकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

केंद्रचालक संस्था पात्रता

 मध केंद्र योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्रचालक संस्था नोंदणींकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्‍त्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फूट एवढी इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनासंबंधी इच्छुकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

            लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिर्वाय राहील. याशिवाय मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिर्वाय राहील.

            अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा ग्रामद्योग अधिकारी यांच्याशी दुरध्वनी क्रमांक 0721-2662762  तसेच मधुक्षेत्रिक पी. के. आसोलकार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 942111665,  8208497189 व दुरध्वनी क्रमांक 0721-2662762 या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामद्योग मंडळ, संचालक मधमहासंचालनालय, शासकीय बंगला क्रमांक 5,  मु. पो. ता. महाबळेश्वर, जिल्हा -सातारा पीन कोड क्रमांक-412806, दुरध्वनी क्रमांक 02168-260264 येथे संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा ग्रामोद्योग विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

000

 

चांदुर बाजार तहसिल कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

 







चांदुर बाजार तहसिल कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

अमरावती दि.27 : जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नुकतीच चांदुर बाजार  तहसिल कार्यालयाला भेट देऊन विविध विभागाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांचासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा उपस्थित होते.

तहसिलदार कार्यालयातील विविध विभागाना भेटी देऊन प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी दिल्या. त्यानंतर चांदुर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथील पुलाच्या बांधकामास भेट देवून उपविभागीय अभियंता यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर पुर्णा मध्यम प्रकल्प विश्रोळी, कर्मयोगी गाडगेबाबांची कर्मभूमी नागरवाडी,  आश्रमशाळा तसेच कलादालनास भेट दिली. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी, चांदुर बाजार तहसीलदार, नायब तहसीलदार, कार्यकारी अभियंता, उपअभियंता  कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

000000

 


Wednesday, July 26, 2023

पीएम किसान सन्मान निधीचा १४वा हप्ता खात्यावर होणार जमा



पीएम किसान सन्मान निधीचा १४वा हप्ता

आज खात्यावर होणार जमा

 

     अमरावती, दि.२६ (जिमाका): केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअतंर्गत पात्र लाभार्थ्यांना 14 व्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यासाठी उद्या , गुरुवार,दि. 27 जुलै 2023 रोजी राजस्थान येथील सिकर येथे भव्य संमेलन आयोजित केले आहे. या समारंभाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

     या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी https://pmevents.ncog.gov.in ही वेबकास्ट लिंक उपलब्ध आहे. जिल्ह्यातील जास्तीत -जास्त शेतकऱ्यांनी मोबाईलवरुन ऑनलाईन सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी केले आहे. 

00000


डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत

 

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत

प्रस्ताव सादर करण्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत

 

       अमरावती, दि. 26 : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2023-24 अंतर्गत ज्या मदरशांना आधुनिक शिक्षणासाठी शासकीय अनुदान हवे आहे, त्यांनी 10 ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

       डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी मदरशांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी, ऊर्दू हे विषय शिकविण्यासाठी शिक्षकांना मानधन, पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान, मदरशांमध्ये राहून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती या बाबींची माहिती नमुन्यात सादर करावी. इच्छुक मदरशांनी शासन निर्णय दि. 11 ऑक्टोबर 2013 अन्वये नमुद केलेल्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष येथील अल्पसंख्यांक शाखेत दि. 10 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रस्ताव दोन प्रतीमध्ये कार्यालयीन वेळेत सादर करावा.

शासन निर्णयातील तरतुदीनुसार जास्तीत जास्त तीन डी.एड. अथवा बी.एड. शिक्षकांना मानधन देण्यात येईल. शिक्षणासाठी हिंदी, इंग्रजी, मराठी व ऊर्दू यापैकी एका माध्यमाची निवड करुन त्यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. ग्रंथालय तसेच शैक्षणिक साहित्यासाठी प्रथम 50 हजार रुपये व त्यानंतर दरवर्षी 5 हजार रुपये अनुदान देय आहे. तसेच नमुद पायाभूत सुविधांसाठी 2 लक्ष रुपये अनुदान देय आहे. यापूर्वी ज्या प्रयोजनासाठी अनुदान देण्यात आले आहे, त्या प्रयोजनासाठी पुन्हा अनुदान देय असणार नाही. तसेच ज्या मदरशांना ‘स्कीम फॉर प्रोव्हायडींग क्वॉलिटी एज्युकेशन इन मदरसा (एसपीक्यूइएम) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे, अशा मदरशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

       योजनेचे प्रस्ताव 10 ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दि.31 ऑगस्ट 2023 पर्यंत संबंधित प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येतील. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाही याची संबंधितांना नोंद घ्यावी.

 

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन ( गौरव विष्णु काळकर)

 

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन

( गौरव विष्णु काळकर)

 

अमरावती, दि. 26 :  येथील  गौरव विष्णु काळकर   (वय 25 वर्षे, रा. कुंभारवाडा, खोलापुरी गेट, अमरावती) ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

गौरव विष्णु काळकर  हे दि. 31 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी  9 वाजता कुंभारवाडा, खोलापुरी गेट येथून घरून कामावर जातो असे सांगितले व  कोठेतरी निघून गेले आहे. शोध घेतला असता ते सापडले नाहीत. 

त्यांचा वर्ण गोरा, उंची पाच फूट सात इंच, बांधा मजबूत, घरून जातेवेळी  अंगात पांढरा जिन्स पॅन्ट, ऑरेंज रंगाचे फुल बाह्यांचे शर्ट  घातलेले होते.

उपरोक्त वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात (0721)-2678133  या दूरध्वनी क्रमांकावर  किंवा संजय लोंदे  8055226211 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन खोलापुरी गेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

 

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘बीएलओ’ घेणार घरभेटी उपविभागीय अधिकारी यांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

 

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘बीएलओ घेणार घरभेटी

उपविभागीय अधिकारी यांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

 

अमरावती, दि.26:  मतदार यादी अद्ययावत व अचूक होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन मतदारांच्या तपशीलाची पडताळणी कुटुंब प्रमुखांकडून करून घेणार आहेत. त्यांना नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन दर्यापूर उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी केले आहे.

दर्यापूर विधानसभा मतदार संघ अंतर्गत एकुण बीएलओ पर्यवेक्षक 20, एकुण बीएलओ 341 व एकुण मतदार केंद्र 341 आहेत. तसेच दर्यापूर विधानसभा मतदार संघामध्ये एकुण पुरूष मतदार 1 लाख 53 हजार 650 एकुण स्त्री मतदार 1 लाख 42 हजार 323 तर एकुण तृतीय पंथी मतदार 4 असे एकुण मतदार संख्या 2 लाख 95 हजार 977 आहेत.

भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधार‍ित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूकीमध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मतदारांसाठी नाव नोंदणी, नाव वगळणे तसेच  तपशिलातील दुरूस्ती इत्यादी कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याव्दारे घरोघरी भेट देऊन 21 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात येणार आहे.

यासाठी नागरिकांनी बीएलओ यांना सहकार्य करून मतदार यादीत आपले नावे तपासावे. 18 वर्षावरील मुलामुलींचे नाव यादीत समाविष्ट करावे. नाव, वय, घर क्रमांक, लिंग यामध्ये चुका असल्यास दुरूस्तीसाठी संबंधित बीएलओ यांचेकडे अर्ज करावा. मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाण‍ीकरण, मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादी सुधारणा करणे तसेच अस्पष्ट छायाचित्र बदलून त्याऐवजी योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करणे, विभागाची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करणे व मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे याबाबत सूचना असल्यास या कार्यालयास दाखल करावे.

याशिवाय नमुना 1 ते 8 तयार करणे व 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधार‍ित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करणे हे 30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत होईल. एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा कालावधी दि. 17 ऑक्टोंबर 2023 आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 17 ऑक्टोंबर ते 30 नोव्हेंबर 2023 असून दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणुक अधिकारी यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार विशेष मोहिम राबविण्यात येईल. दावे हरकती निकालात काढण्याची तारीख 26 डिसेंबर 2023 पर्यंत आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

 

 

 

 

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...