मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘बीएलओ’ घेणार घरभेटी जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

 


मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘बीएलओ’ घेणार घरभेटी

जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 19 :  मतदार यादी अद्ययावत व अचूक होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन मतदारांच्या तपशीलाची पडताळणी कुटुंब प्रमुखांकडून करून घेणार आहेत. त्यांना नागरिकांनी आवश्यक पूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून दि. 1 जून 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पुनरीक्षण पूर्व उपक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दि. 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदार यादीची पडताळणी करणार आहेत.

त्यात दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी पात्र असूनही नोंदणी न केलेले मतदार, दि. 1 जानेवारी 2024 रोजी पात्र ठरतील असे संभाव्य मतदार, पुढील तीन अर्हता दिनांकावर पात्र ठरतील असे संभाव्य मतदार, त्याचप्रमाणे, एकापेक्षा अधिक नोंदी असल्यास, मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, मतदार यादीतील नोंदीत दुरूस्ती  आदी आवश्यक नोंदी घेण्यात येतील.

ही पडताळणी व्यवस्थित होण्यासाठी राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बुथ लेवल एजंट) नेमण्याबाबत सूचना देण्यात आल्या. नागरिकांना अधिकाधिक नाव नोंदणी करावी, यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत महिला, दिव्यांग, आदिवासी जमात, भटक्या जमाती यांच्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करणार आहेत. या शिबिरांमध्ये अधिकाधिक नाव नोंदणी व्हावी, यासाठी राजकीय पक्षांनी आवश्यक सहकार्य करण्यात यावे. विशेष शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बुथ लेवल एजंट) यांची नेमणूक करावी. तथापि, राजकीय पक्षांनी सदर सहकार्य करतांना पक्षांनी प्रचार, प्रसिध्दी करण्यात येऊ नये, अशा सूचना श्रीमती कौर यांनी यावेळी दिल्या.

          मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी आधार क्रमांक स्वेच्छेने नमुद करता येतो. नागरिकांनी आधार क्रमांक नमुद केले नाहीतरी त्यांचे अर्ज नाकारण्यात येणार नाहीत. त्यांचाही अर्ज विचारात घेतला जाणार आहे. दि. 17 ऑक्टोंबर 2023 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. या यादीमध्ये काही दुरूस्ती, नावे वगळणी करणे अथवा नावे समाविष्ट करणे यासाठी दि. 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये दावे व हरकती दाखल करता येईल. त्यानंतर दि. 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल.

          राजकीय पक्षांना दावे हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बुथ लेवल एजंट) यांना एकाच वेळी एका दिवशी 10 अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे देता येईल. युवकाची मतदार नोंदणी वाढावी म्हणून विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये युवकांच्या मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांचे सहकार्य घेण्यात यावे अशा सूचना सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना पाठविण्यात येतील. राजकीय पक्षांच्या विविध विंगचा उदाहरणार्थ महिला, युवक, तृतीयपंथी व अपंग विंगचा मतदार नोंदणीच्या प्रचारासाठी सहभाग घ्यावा. त्यावर मतदार नोंदणीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या विविध विंगचे सहकार्य घेण्याबाबत सर्व मतदार मतदार नोंदणी अधिकाऱ्यांस कळविण्यात येईल, असेही श्रीमती कौर यावेळी म्हणाल्या.

        जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन व्यवहारे, भारतीय जनता पार्टीचे राजेश आखेगावकर, बहुजन समाज पार्टीचे भगवान लोणारे, आम आदमी पार्टीचे राजू तायडे आदी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती