Thursday, July 20, 2023

अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान कडधान्य योजना शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

शासन आपल्या दारी

अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान कडधान्य योजना

शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 20 :  अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान कडधान्य योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीज प्रक्रिया प्रकल्पाचा लाभ घेता येईल. तरी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पादित बियाण्यांवर प्रक्रिया करुन दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे उत्पादन करणारे शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी यंत्र सामुग्री तसेच बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लक्ष यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. ही बाब बँक कर्जाशी निगडीत असून शेतकरी उत्पादक संघ व कंपनीने बँकेकडे यासाठी प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी या बाबीच्या लाभास पात्र राहील.

गोदाम सुविधा

अन्नधान्य उत्पादनाच्या सुधारित साठवणुकीसाठी व मूल्य वृध्दीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे. या योजनेंतर्गत 250 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 1 लक्ष 25 हजार यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. इच्छुक अर्जदार शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना किंवा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी संघ या बाबीच्या लाभास पात्र राहील. वरील दोन्ही घटकांसाठी इच्छुक शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा.

जिल्ह्यासाठी प्राप्त लक्षांकापेक्षा अधिक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीचे अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समितीच्या मान्यतेने सोडत पध्दतीने लाभार्थी शेतकरी गटांची निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

बीजप्रक्रिया ड्रम किंवा यंत्र

शेतकरी वैयक्तिक वापरासाठी बीज प्रक्रिया यंत्र खरेदी करु शकत नाहीत. त्यामुळे शेतकरी गटामार्फत बीज प्रक्रिया ड्रम किंवा यंत्र अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मनुष्यचलित बीज प्रक्रिया ड्रम किंवा यंत्र खरेदीसाठी 8 हजार रुपये प्रति युनिट किंवा किमतीच्या 50 टक्के यापैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. शेतकरी गटासाठी बीज प्रक्रिया ड्रम किंवा यंत्र या बाबीची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करावयाची असल्याने या बाबीच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी गटांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

कडधान्य व पौष्टिक तृणधान्य पिकांसाठी साठवणूक सुविधा निर्माण झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल. कडधान्य व पौष्टिक तृणधान्य अंतर्गत घरगुती साठवणूक कोठी या बाबीसाठी लाभार्थ्यांचे स्थानिक पातळीवर अर्ज मागविण्यात येत आहेत. या बाबीसाठी एका लाभार्थ्यास 5 क्विंटल मर्यादेपर्यंत साठवणूक कोठीचा लाभ देण्यात येईल. 5 क्विंटल धान्य साठवून कोठीसाठी किमतीच्या 50 टक्के किंवा 2 हजार रुपये मर्यादेत अनुदान अनुज्ञेय आहे. तरी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...