Friday, July 14, 2023

टोमॅटो लागवड, उत्पन्न व भावाबाबतची वस्तुस्थिती लवकर स्पष्ट होणार - कृषी आयुक्त

 टोमॅटो लागवड, उत्पन्न व भावाबाबतची वस्तुस्थिती लवकर स्पष्ट होणार

- कृषी आयुक्त

           अमरावती, दि. 14: राज्यात टोमॅटोचे भाव अचानक वाढल्याने कृषी आयुक्त पुणे यांनी नुकतीच राज्यातील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, संशोधन संचालक आणि कृषी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करुन सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत टोमॅटो लागवड, उत्पन्न व भावाबाबत अधिक वस्तुस्थिती स्पष्ट होण्याकरीता संबंधीतांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हा अहवाल प्राप्त होताच टोमॅटो लागवड, उत्पन्न व भावाबाबतची वस्तुस्थिती लवकर स्पष्ट होणार असल्याचे राज्याचे कृषी आयुक्त यांनी कळविले आहे.

           राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण 56-57 हजार हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे 40 ते 42 हजार हेक्टर तर रब्बी व उन्हाळी हंगामात सर्वसाधारण 16 ते 17 हजार हेक्टर क्षेत्र असते. यापासून सर्वसाधारणपणे 10 लाख मे. टन उत्पादन अपेक्षित असते. जुलै-2023 मध्ये बाजारात टोमॅटो चे वाढलेले दर लक्षात घेता यावर सविस्तर माहिती आणि उपयोजना साठी कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 1 जुलै आणि दिनांक 11 जुलै रोजी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, संशोधन संचालक, जिल्ह्यांचे अधीक्षक कृषी यांच्या समवेत या प्रश्नांचे अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीत टोमॅटो पिकाखालील खरीप 2023 हंगामातील क्षेत्र आणि उत्पादन याबाबत माहिती तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात गेल्या डिसेंबर 2022 ते मे 2023 दरम्यान टोमॅटोला बाजारात अतिशय अल्प दर मिळाल्याने (डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान 6 ते 9 रुपये प्रति किलो, मार्च 2023 दरम्यान 11 रुपये प्रति किलो व एप्रिल 2023 ते मे 2023 दरम्यान 8 ते 9 रुपये प्रति किलो) शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. त्यामुळे नवीन टोमॅटो लागवडीवर त्याचा विपरित परिणाम झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

            या व्यतिरिक्त मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवेळी पाऊस, गारपीट यामुळे देखील टोमॅटो आणि इतर भाजीपाला याचे नुकसान झाल्याने त्याचा उत्पादनावर विपर‍ित परिणाम झाला असल्याचे दिसून येते. चालू वर्षी पाऊस देखील जून महिन्यात जवळपास 15 दिवस उशिरा आला आणि तो सरासरीच्या जेमतेम 54 टक्के एवढा झाला. यामुळे नवीन लागवडीस उशीर झाला असल्याचे आढळून येते. टोमॅटो पिकावरील कीड व रोग याबाबत देखील या बैठकीत चर्चा करून नवीन जाती, कीड आणि रोग प्रतिबंधात्मक उपाय योजना यावर चर्चा करण्यात आली.

       सध्या शेतकरी नवीन टोमॅटोची लागवड करत आहेत. याबाबत येत्या 7-8 दिवसात वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होईल. टोमॅटो लागवडीबाबत नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रमुख क्षेत्र असून त्या जिल्ह्याच्या अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कडून प्रामुख्याने नवीन लागवडी बाबत सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. तो प्राप्त होताच टोमॅटो लागवड, उत्पन्न व भाव याबाबत अधिक वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे कृषी आयुक्त, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

--

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...