Monday, July 17, 2023

प्रधानमंत्री पीक विमा योजना चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली हिरवी झेंडी

 


प्रधानमंत्री पीक विमा योजना चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी

 दिली हिरवी झेंडी

 

अमरावती, दि. 17 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेची व्यापक जनजागृती व्हावी तसेच या योजनेची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोहचावी, यासाठी विमा कंपनीतर्फे दोन चित्ररथ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आज या चित्ररथाला जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी हिरवी झेंडी दाखूवन मार्गस्थ केले. यावेळी प्रचार, प्रसिध्दी साहित्याचेही अनावरण करण्यात आले. पीक विमा योजनेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती कौर यांनी यावेळी केले.

हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित करण्यात आलेल्या पिकांसाठी या योजनेचा लाभ घेता येईल. हवामान घटाकाच्या परिस्थितीमुळे पिकांची पेरणी अथवा लावणी न झाल्यास होणारे नुकसान, हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे होणारे नुकसान तसेच पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होते. अशावेळी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमुळे विमा संरक्षणाचे कवच मिळणार आहे. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ ‘एक रुपया’ भरुन नोंदणी करावयाची आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सहभागी होण्यासाठी शेतकरी बांधवांना सेतू किंवा बँकेमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. यावर्षी या योजनेची अंमलबजावणी अमरावती जिल्ह्यामध्ये ‘रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी’च्या माध्यमातून होणार आहे. या संधीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, यासाठी कृषी विभागामार्फत तसेच जिल्हा व तालुकास्तरीय विमा प्रतिनिधी प्रचार व प्रसिध्दी करीत आहेत. शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचा विमा 31 जुलै पर्यंत उतरवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी गजानन देशमुख तसेच रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी मार्कुश गामीत, अभिलाष नरोडे, अमरदीप कुकडे, रोशन देशमुख आदी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...