स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

 





स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करावे

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 25 :  भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9.05 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले. या विषयी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अविनाश बारगळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, पोलीस उपायुक्त सागर पाटील, मनपा सहायक आयुक्त भूषण पुसदकर, तहसीलदार संतोष काकडे, पोलीस निरीक्षक अर्जून ठोसरे, शिक्षण उपसंचालक एस.एस. काळुसे, क्रीडा विभागाने एस.पी. विघ्ने, महावितरण कार्यकारी अभियंता आनंद काटकर, जिल्हा परिषदेचे सहायक शिक्षक गजानन देशमुख, नायब तहसीलदार अरविंद माळवे, समन्वयक रमेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तुषार काळे, शिक्षण विभागाचे बुध्दभूषण सोनोने, प्रिया देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. कटियार म्हणाले की, अधिकाधिक लोकांना मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8.35 ते 9.35 यावेळेत इतर कार्यालय, संस्थांनी ध्वजारोहण किंवा शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करु नये.  असे समारंभ सकाळी 8.35 च्या पूर्वी किंवा सकाळी 9.35 च्या नंतर आयोजित करावे. कार्यक्रमात राष्ट्रगीतानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राष्ट्रगीत बँड पथकाव्दारे सादर करण्यात येईल.

महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील साफसफाई आपल्या विभागामार्फत करावी. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, लि. अमरावती यांनी कार्यक्रमस्थळी वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कार्यक्रमाच्यावेळी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी पोलीस पथक, बँड पथक तसेच ध्वजारोहणाची रंगीत तालीम घ्यावी. राष्ट्रध्वज सूर्यास्तास उतरवला जाईल, याची दक्षता समितीने घ्यावी. तसेच कार्यक्रमस्थळी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस विभागाने व्यवस्था करावी.

स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विभागीय कार्यालय, शिक्षण संस्था, महाविद्यालय, शाळा तसेच सेवाभावी संस्था, क्रीडा मंडळ यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करावा. त्यासाठी लागणारी रोपे सामाजिक वनीकरण विभाग, अमरावती यांनी पुरवावी. तसेच अतिथी व उपस्थितांची बैठक व्यवस्था, आवश्यक स्वयंसेवक, ध्वनीयंत्रणा आदी व्यवस्था काटेकोर असावी, अशा सूचना श्री. कटियार यांनी यावेळी दिल्या.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती