Wednesday, July 12, 2023

महिला उद्योजकांना प्रोत्साहनासाठी ‘एमआयडीसी’त ‘प्लग ॲन्ड प्ले’ उपक्रम राबविणार - उद्योग मंत्री उदय सामंत









 नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी ‘सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’

महिला उद्योजकांना प्रोत्साहनासाठी ‘एमआयडीसी’त ‘प्लग ॲन्ड प्ले’ उपक्रम राबविणार

-         उद्योग मंत्री उदय सामंत

अमरावती, दि. 12 : महिला उद्योजकांना प्रोत्साहन देऊन उद्योग क्षेत्रात त्यांचे योगदान वाढविण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळातर्फे ‘प्लग ॲन्ड प्ले’ उपक्रम राबविला जाईल. उद्योग क्षेत्रासाठी ‘सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 (सीडीसीपीआर)’ निर्माण करण्यात आली असून, त्यामुळे नव्या उद्योगांना चालना मिळेल, असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात आयोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 कार्यशाळेचे उद्घाटन उद्योगमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार रवी राणा, जिल्हाधिकारी पवनीत कौर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, नितीन व्यवहारे, मुख्य नियोजिका डॉ. प्रतिभा भदाणे यांच्यासह एमआयडीसी असोसिएशनचे पदाधिकारी व उद्योजक यावेळी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीचे (सीडीसीपीआर) लोकार्पण अमरावतीत होत आहे. ही बाब जिल्ह्यासाठी तसेच विदर्भासाठी गौरवास्पद आहे. नवउद्योजक वाढीसाठी ही नियमावली उपयुक्त आहे. उद्योजकांच्या गरजा लक्षात घेऊन एमआयडीसी क्षेत्रात उद्योग वाढीसाठी सीडीसीपीआरची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमातून रोजगार निर्माण करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. टप्प्याटप्प्याने राज्यात सर्वत्र सीडीसीपीआरचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

औद्योगिक विकास महामंडळामध्ये महिला उद्योजकांना प्रोत्साहन देऊन या क्षेत्रात त्यांचे योगदान वाढावे, यासाठी ‘प्लग ॲन्ड प्ले’ उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून छोट्या उद्योगांनाही चालना देण्यात येणार आहे. यात बचतगटाच्या महिलांना प्राधान्य देण्यात येणार असून सुमारे 50 एकर जागेवर हा उपक्रम राबविण्यात येईल. आज या उपक्रमाला तत्वत्: मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तसेच मेळघाटात आदिवासी बांधवांना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी नाशिक, चंद्रपूरच्या धर्तीवर मेळघाट येथेही ‘ट्रायबल क्लस्टर’ निर्माण करण्यात येणार आहे.

‘पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क’मध्ये अनेक मोठे उद्योजक गुंतवणूक करण्यात इच्छूक असून त्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात भर पडेल व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. पार्क उभारणीसाठी लागणाऱ्या जमीन संपादनाचे काम जिल्हा प्रशासनाने गतीने पूर्ण करावे. या पार्कमुळे अनेक चांगले उद्योग अमरावतीत येतील. अनेक कंपन्या येथे येण्यास इच्छूक आहेत. विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. येत्या काळात कापसावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग येथे सुरु होतील. त्याचा लाभ थेट कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बांधवांना मिळणार आहे.

उद्योजक व कारखानदारांना सुलभरित्या उद्योग उभारता यावा, यासाठी ‘एक खिडकी योजना’ प्रभावीपणे राबविली जाणार आहे. या माध्यमातून उद्योजकांना 30 दिवसांत उद्योगाला लागणाऱ्या आवश्यक परवानग्या दिल्या जाणार आहेत. राज्यात नवीन उद्योग विकासाच्या दृष्टीने शासनाद्वारे सर्वंकष प्रयत्न होत असून परदेशी गुंतवणूकीतही महाराष्ट्र अग्रेसर आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा शुभारंभ करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

विमानतळाची सुविधा असेल तर औद्योगिक विकासाला गती मिळते. त्यामुळे अमरावती येथील विमानतळाच्या विकास होण्यासाठी सकारात्मक प्रयत्न होत आहेत. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेतून मागील तीन वर्षात उद्योजकांना सुमारे 80 कोटी रुपयाचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. यावर्षी 13 हजार 360 उद्योजकांना 550 कोटी अनुदान वितरित करण्यात आले आहे. या माध्यमातून जवळपास 30 हजार व्यक्तींना रोजगार मिळाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

  उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच जुन्या उद्योगांच्या पुनर्बांधणीसाठी सीडीपीसीआर नियमावली तयार करण्यात आली असल्याचे श्री. शर्मा यांनी प्रास्ताविकात सांगितले. सीडीपीसीआरबाबतची सविस्तर माहिती श्रीमती भदाणे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दिली.

                                                 ०००

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...