सलोखा योजनेचा लाभ घ्यावा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 


सलोखा योजनेचा लाभ घ्यावा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अमरावती, दि. 14 : राज्यात जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. विविध वाद संपुष्टात येवून समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा व एकमेकांतील सौख्य, शांतता व सौहार्द वाढीस लागावे यासाठी शासनाने ‘सलोखा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. चांदुर रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेताशी संबंधित तलाठी व राजस्व  मंडळ अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधून सलोखा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

प्रलंबित प्रकरणांमध्ये मुख्यत: मालकी हक्काबाबत, शेत बांधावरुन होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबत, रस्त्यांचे वाद, शेतजमीन मोजणीवरुन होणारे वाद, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेतावरील अतिक्रमण, शेती वहीवाटीचे वाद, भावंडांमधील वाटणीचे वाद, शासकीय योजनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचे वाद इत्यादी कारणांमुळे शेतजमीनीचे वाद समाजामध्ये आहेत. शेतजमीनीचे वाद हे अत्यंत क्लिष्ट स्वरुपाचे व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालय व प्रशासनातील पुरेशा यंत्रणेअभावी हे वाद वर्षानुवर्षे चालू आहेत. शेतजमीन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा व संवेदनशील विषय असल्यामुळे त्यातील वादांमुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण झाला आहे. या वादांमुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले असून आजच्या पिढीचाही खर्च व वेळेचा अपव्यय होत असून अशा प्रकारचे वाद संपुष्टात येताना दिसत नाही.

शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांकडील आपआपसातील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य वाढीस लागण्यासाठी सलोखा योजना महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये एका शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे तसेच दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क 1 हजार रुपये व नोंदणी फी 1 हजार रुपये आकारण्यात येईल. यासाठी सलोखा योजनेचा लाभ घ्यावा, असे चांदुर रेल्वे तहसिलदार यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती