दोन दिवसीय चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन महोत्सवाला पर्यटकांची पसंती

 














दोन दिवसीय चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन

महोत्सवाला पर्यटकांची पसंती

 

अमरावती, दि. 15 :  थंड हवेच्या ठिकाणासह पावसाळी पर्यटन स्थळ ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून चिखलदऱ्याची ओळख निर्माण व्हावी यासाठी ‘चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमास पर्यटकांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मान्सून पर्यटन महोत्सवामुळे येथील कोरकू आदिवासी बांधवांची संस्कृती, जीवनमान, खाद्य पद्धतींची माहिती जाणून घेता आली, असे मत म्हाडाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्याधिकारी महेशकुमार मेघमाळे यांनी आज चिखलदरा येथे व्यक्त केले.

       चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन चिखलदरा नगरपरिषद विश्रामगृह येथे श्री. मेघमाळे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे , सिपना कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जयपूरकर , नायब तहसीलदार गजानन राजगडे, पोलिस निरीक्षक आनंद पिदुरकर, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

     कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थ्यांनी बॅन्ड पथकाव्दारे अतिथींचे स्वागत केले. तसेच कोरकू बांधवांनी घुंगरू, बासरी आणि ढोलकीच्या तालावर आदिवासी नृत्य सादर केले. यावेळी वाईल्ड कॉल-पक्षांची बोलीभाषेचे सादरीकरण ताडोबा व्याघ्र प्रकल्प येथील सुमेध वाघमारे यांनी  जंगलातील विविध पशूपक्षांचे हुबेहुब आवाज काढून दाखविले. पर्यटकांनी या कलेला दाद दिली. तसेच गुरुदेव सेवा मंडळाने खंजिरी भजन सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी चिखलदर्‍याविषयी उपस्थितांना माहिती दिली.

      चिखलदरा पर्यटन महोत्सवासह ‘चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सव’ यावर्षीपासून सुरु करण्यात आला आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विशेषत: पावसाळी हंगामात मुसळधार पावसासह डोंगरदऱ्यातून कोसळणारे धबधबे तसेच येथील दऱ्याखोऱ्यांचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येथे उत्साहाने येतात. पावसाळ्यामध्ये येथील निसर्ग सौंदर्य, हिरवळ, जागोजागी असलेले धबधबे, ढगाळ कुंद वातावरण, सकाळी तसेच सायंकाळी धुक्याचे सर्वत्र आच्छादन यामुळे चिखलदरा ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून विकसित व्हावे, यासाठी पर्यटन संचालनायामार्फत येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासींच्या विकासासाठी  पर्यटन विभागाचा पुढाकार महत्त्वपूर्ण आहे. येथे उत्पादित होणारे मध, स्ट्रॉबेरी, बांबूच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सव निश्चितच मदतनीस ठरेल , असा विश्वास श्री. मेघराळे यांनी यावेळी व्यक्त केला .

     पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे वनशेतीमधील रानभाज्या, रानफळे, वनौषधी , मध आणि वनउपज विक्री केंद्र , चिखलदरा कॉफी  यांचे विविध स्टॉल्स लावण्यात आले आहेत.  तसेच गाविलगड किल्ला भ्रमंती (वारसा सहल), मेळघाट निसर्ग छायाचित्रण कार्यशाळा, खाद्य महोत्सव , पंचबोल पॉईंट, गाविलगड किल्ला, भीमकुंड, पवनचक्की, कॉफी उद्यान येथील निसर्ग भ्रमंतीचा सहकुटुंबासह पर्यटकांनी आस्वाद घेतला.  ‘गाविलगडावर बोलू काही’ यावर माहितीपट,  ‘निसर्गसंपन्न चिखलदरा’ या विषयावर पथनाट्य, पावसाळी गिर्यारोहण, ‘प्रेक्षणीय चिखलदरा’ आणि जैवविविधतेवर आधारित माहितीपट अशा विविध उपक्रमांना पर्यटक तसेच स्थानिकांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला. सायकल रॅली तसेच  फन-रनमध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उद्या, रविवार, दि. 16 जुलै रोजी या महोत्सवाचा समारोप होणार आहे. यासाठी जास्तीत-जास्त पर्यटकांनी या महोत्सवाचा सहकुटुंब आनंद घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे संचालन प्रांजली बाविस्कर यांनी केले. यावेळी नगरसेवक, चिखलदरा मान्यून पर्यटन समितीचे पदाधिकारी, सदस्य, आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती