Thursday, July 6, 2023

‘उर्ध्व वर्धा’तून खरीप सिंचनासाठी तीन पाणीपाळ्या प्रस्तावित शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

 

 

‘उर्ध्व वर्धातून खरीप सिंचनासाठी तीन पाणीपाळ्या प्रस्तावित

शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

 

          अमरावती, दि. 6 : उर्ध्व वर्धा प्रकल्पातून खरीप हंगामासाठी पाणीसाठा उपलब्ध असल्यास तीन पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित असून, लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी 31 जुलैपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून 95.50 किमीपर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या 42.40 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसचित नदीनाल्यांवरील लाभधारकांना खरीप हंगामासाठी  पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे (टेल टु हेड) या तत्वानुसार सिंचन होणे आवश्यक आहे.

 

जुलै ते नोव्हेंबरदरम्यान तीनवेळा पाणी मिळेल

 

         कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7 संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून 31 जुलैपर्यंत तिथेच सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. खरीप हंगामात दि. 1 जुलै  ते 14 नोव्हेंबर 2023 या कालावधीत मागणीप्रमाणे तीन पाणी पाळ्या देण्यात येतील.

 

लाभधारकांनी नियम पाळणे आवश्यक

 

          इच्छुक लाभधारकांनी त्यांच्याकडील थकबाकीची एक तृतियांश व चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरावी.  उपसा सिंचन लाभधारकांनी नळमार्गावर पाणी मोजमाप यंत्र बसवावे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर या पटीत असावे. पाणी अर्ज मंजूर करुन घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा.

मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. लाभक्षेत्रातील कालव्यापासून 35 मी. पर्यतच्या विहिरींच्या पाण्याने सिंचित होत असलेल्या नगदी पिकांसाठी (उदा. ऊस, कापूस, केळी व फळबाग) पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50 टक्के  दर लागू असेल.

पाणीपट्टी न भरणा-या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही. व त्यांचा पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल व थकबाकीवर शासन निर्णय नियमानुसार द.सा.द.शे. 10 टक्के दरान विलंब आकारण्यात येईल.

 

शेतचा-या स्वच्छ ठेवा

 

        कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची आहे. शेतचारी स्वच्छते अभावी पाणी पुरवठयामध्ये व्यत्यय आल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. उडाफ्याचे क्षेत्रास पाणीपुरवठा करण्यात येणार नाही व तसेच लाभधारकांनी मंजूर क्षेत्राचे मर्यादेपर्यंत कालवा व नदी-नाल्याच्या पाण्याचा वापर करावा. मंजूरीपेक्षा जादा क्षेत्र भिजविल्यास व अनधिकृतपणे पाणी घेतल्यास नियमाप्रमाणे पंचनामा करुन दंडनीय आकारणी करण्यात येईल. मंजूर न केलेल्या क्षेत्रास पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही.

 

       लाभधारकाने दिवस व रात्री पाणी घेणे बंधनकारक आहे. अडचणी असल्यास कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता पाणी पाळी पत्रकात बदल करण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांना राहतील. थकबाकीदार लाभधारक व थकबाकीदार पाणीवापर संस्थांना पाणी देणे बंधनकारक राहणार नाही.   वितरिकेत पाणी पाळीमध्ये पाणी चालू असताना लाभधारक वितरिकेचा दरवाजा  वेळी अवेळी कमी-जास्त प्रमाणात उघडतात. त्यामुळे त्या वितरिकेवरील चालू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी जास्त होऊन ‘टेल टू हेड सिंचनावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे त्या वितरिकावरील पिकांना संचलनाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे प्रस्तावित पाणीपाळी कालावधीत वाढ होते.

 

      जर लाभधारकांनी संचलन कार्यक्रमाप्रमाणे टेल टू हेड रात्रंदिवस शेजपाळीपध्दतीने पिकांना पाणी घेतले तर संभाव्य पाणीपाळीचा कालावधी कमी होवून पाण्याचा अधिकाधिक लाभ होईल. संपूर्ण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतक-यांनी कोठेही दारे स्वतः उघडून टेल टू हेड सिंचन प्रकारात अडथळा आणल्यास पाण्याचा नाश तर होतोच शिवाय पाणीपाळी कालावधी वाढतो. उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...