चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा जागर; जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी: जिल्ह्यातील 216 गावात फिरणार चित्ररथ






 चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा जागर;

जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी: जिल्ह्यातील 216 गावात फिरणार चित्ररथ

 

अमरावती, दि. 9 (जिमाका): जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत सामाजिक न्याय विभागाव्दारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा प्रचार, प्रसार करणाऱ्या एलइडी चित्ररथास जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 216 गावामध्ये तीन चित्ररथाव्दारे शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून आज सकाळी या चित्ररथाला जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे, सहायक आयुक्त माया केदार, नगरपालिका प्रशासन अधिकारी सुमेध अलोणे, प्र. जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, माविमचे जिल्हा समन्वयक सुनील सोसे, सहायक माहिती अधिकारी सतीश बगमारे, योगेश गावंडे, सागर राणे, कुमार हरदुले, गजानन परटके आदी यावेळी उपस्थित होते.

 

जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत सामाजिक न्याय विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना समाजातील तळागळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे नियोजन चित्ररथाव्दारे करण्यात आले आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये विविध योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या चित्ररथाच्या माध्यमातून गावा-गावात दाखविण्यात येणार आहेत.

 

जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 216 गावांमध्ये हा चित्ररथ फिरून माहिती देणार असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी केले. चित्ररथामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, कन्यादान योजना, स्वाधार योजना, विशेष घटक योजनेतून विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहे, विविध शिष्यवृती योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल्स पुरविणे, ज्येष्ठ नागरिक धोरण, रमाई आवास योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन, शासकीय पुर्नवसन योजना, राजर्षि शाहू गुणवत्ता पुरस्कार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य योजना यासह इतर योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या एलइडी चित्ररथाच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती