संविधान महानाट्यातून अमरावतीकरांनी अनुभवला घटना निर्मितीचा संघर्ष महासंस्कृती महोत्सवाची संविधान महानाट्याने सांगता

 


















संविधान महानाट्यातून अमरावतीकरांनी अनुभवला घटना निर्मितीचा संघर्ष

महासंस्कृती महोत्सवाची संविधान महानाट्याने सांगता

 

अमरावती, दि.22 (जिमाका) : महासंस्कृती महोत्सवाच्या शेवटच्या आणि पाचव्या दिवशी 'संविधान- डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या महानाट्यातून घटना निर्मितीचा प्रत्यक्ष संघर्ष अमरावतीकरांनी अनुभवला. स्वातंत्र्य चळवळीपासून ते स्वातंत्र्यप्राप्तीचा आणि त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संविधान निर्मितीचा सखोल व बोलका जीवनपट महानाट्यातील कलाकारांनी रंगमंचावर जिवंत केला. या महानाट्याने पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाची  सांगता झाली. अमरावतीकरांनी या संविधान महानाट्याला भरभरून प्रतिसाद देत महानाट्य बघण्यासाठी गर्दी केली.

            पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने 18 फेब्रुवारीपासून सायन्सस्कोर मैदान येथे पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवसांच्या विविध सांस्कृतिक, लोककला, संगीतमय कार्यक्रमाच्या आयोजनानंतर  नितीन बनसोड दिग्दर्शित व अमन कबीर लिखित 'संविधान-डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या महानाट्याने महासंस्कृती महोत्सवाची सांगता झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मीतीसाठी घेतलेले परिश्रम, त्याग आणि समर्पण अत्यंत प्रभावीपणे कलाकारांनी या महानाट्यातून मांडले.

             तीन तास चाललेल्या या संविधान महानाट्याला प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी पसंती दर्शविली. सायन्सकोर मैदान प्रेक्षकांच्या गर्दीने फुलून गेले होते. नागरिकांसह अधिकारी, कर्मचारी वर्ग आपल्या कुटुंबासह या महानाट्याला उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, मनपाचे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासह अन्य अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

            संविधान महानाट्याच्या मुख्य भूमिकेत रवी पटेल, विवेक फूसे, सुवर्णा नलोडे, राकेश खाडे, सुनील हिरकणे,आरुष ढोरे, रवींद्र तिवारी, विजय रामटेके, सुरेखा गायकवाड, अनिल पालकर, समीर दंडारे, चंद्रकांत साळुंखे,

मुमताज सय्यद, नवाब हमीदउल्ला नंदू मानकर, श्याम वर्मा, शकील कुरेशी, सर्जेराव गलफट कोरिओग्राफर पंकज डोंगरे, रोहन पराते, बशीर खान यांच्यासह शेकडो कलाकारांनी सहभाग घेतला होता.

               आयोजन समितीमधील अधिकारी वर्गाच्या वतीने सहभागी मुख्य कलाकारांचा रंगमंचावर सत्कार करण्यात आला. महोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांचा सन्मानचिन्ह देऊन विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. महोत्सव यशस्वी केल्याबद्दल श्री. भटकर यांनी स्थानिक कलाकारांचे तसेच प्रेक्षकांचे आभार मानले.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती