अटल भूजल योजना; जिल्हास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धा

 







अटल भूजल योजना; जिल्हास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धा

 

अमरावती, दि. 13 (जिमाका) :   अटल भूजल योजने अंतर्गत पाणी वाचविण्यासाठी  विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अटल भूजल योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमध्ये पाणी बचत काळाची गरज या विषयावर जिल्हास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धेचे तर ग्रामपंचायत स्तरावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थ, युवक व महिलांनी उर्त्स्फूतने सहभागी व्हावे, असे आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा राजेश तु. सावळे  यांनी केले आहे.

 

अटल भूजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील चांदूर बाजार, मोर्शी व वरुड तालुक्यातील 93 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. माहिती, शिक्षण व संवाद उपक्रमांतर्गत पाणी बचत काळाची गरज या विषयावर चित्रकला व निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी  स्पर्धकांनी चित्र किंवा सुव्वाच अक्षरात कमीत कमी 1 हजार  शब्दाचा निबंध लिहून बंद लिफाफ्यात संबंधित ग्रामपंचायतीमध्ये दि. 20 फेब्रुवारी 2024 ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमा करावे. निबंध व चित्रकला स्पर्धेत क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच सर्वच सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर शालेय विद्यार्थी व महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक ग्रामपंचायत निहाय उत्कृष्ट रांगोळीला प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकानुसार बक्षीस, प्रमाणपत्र व सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 

            अटल भूजल योजने अंतर्गत तालुक्यात पाणी वाचविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमध्ये प्रचार रथ फिरवून जनजागृती करण्यात आली. तर विविध कार्यशाळा, प्रशिक्षणे, अभ्यास दौरा, प्रदर्शनीत स्टॉल लावून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर व्यापक जनजागृती होण्यासाठी लोकांचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन भूजल मित्रांची निवड ग्रामपंचायततर्फे करण्यात आली. त्यांना अटल भूजल योजनेतर्फे ओळखपत्र व अटल भूजल योजनेचा लोगो असलेली टी-शर्ट व टोपी वाटप करण्यात आले. तर शालेय विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्व अधिक समजण्यासाठी शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा यासह वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या.

 

            अटल भूजल योजने अंतर्गत भूजल ग्राम समृद्ध स्पर्धेचे आयोजन 2022-23 मध्ये करण्यात आले होते. त्यामध्ये भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत 27 ग्रामपंचायतीने सहभाग घेतला होता. त्यामध्ये वरुड तालुक्यातील जरुड ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक, झटामझिरी ग्रामपंचायतीने व्दितीय क्रमांक तर मोर्शी तालुक्यातील अंबाडा ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांक मिळाले आहे. या ग्रामपंचायतीना अनुक्रमे 50 लक्ष, 30 लक्ष व 20 लक्ष रुपयांचा पुरस्कार मंजूर झाला आहे.

 

अटल भूजल योजने अंतर्गत भूजल ग्राम समृद्ध स्पर्धा सन 2023-24  साठी जास्तीत जास्त ग्रामपंचायतीने सहभागी होण्यासाठी दि.  28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी केले आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती