पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहनांचे शहर पोलीस विभागाला हस्तांतरण ; प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण

 

पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार

 

-पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहनांचे शहर पोलीस विभागाला हस्तांतरण ; प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण

 













 

          अमरावती, दि. 21 : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभाग अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असतो. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना पोलीस विभागाचे सर्व सुविधायुक्त अत्याधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात शहर व ग्रामीण पोलीस विभागाला मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे दिले.

 

पोलीस कवायत मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्तालयाला नवीन अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहनांचे हस्तांतरण आणि पोलीस आयुक्तालयातील प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, माजी महापौर चेतन गावंडे, निवेदिता दिघडे, तुषार भारतीय यांच्यासह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण) विशाल आनंद, पोलीस उपायुक्त सागर पाटील, गणेश शिंदे, कल्पना बारावकर व सर्व पोलीस निरीक्षक आदी यावेळी उपस्थित होते.

 

प्रारंभी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व वाहनांच्या ताफ्याला हिरवी झेंडी दाखवून वाहने विभागाला हस्तांतरीत करण्यात आलीत. त्यानंतर पोलीस आयुक्तालयातील नुतणीकरण करण्यात आलेल्या प्रशिक्षण सभागृहाचे पालकमंत्र्यांचे हस्ते फीत कापून लोकार्पण झाले.

 

श्री. पाटील म्हणाले की, अमरावती पोलीस खात्याला जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहने खरेदीसाठी 2 कोटी 26 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच दुचाकी वाहनांसाठी 8 लाख 30 हजार रुपये व सभागृहाच्या नुतणीकरणासाठी 12 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार मंजूर निधीतून उपरोक्तप्रमाणे विभागाच्या बळकटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. यापुढेही पोलीस खात्याचे आधुनिकीकरण तसेच निवासस्थानांच्या दुरुस्ती, नवीन पोलीस स्टेशन निर्मिती, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, वेलफेअर फंड, सभागृहांची निर्मिती, अत्याधुनिक साहित्य खरेदी आदींसाठी सीएसआर फंड व जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

 

पुढे बोलताना ते म्हणाले की, पोलीसांच्या सन्मानाला कुणाव्दारेही ठेच पोहोचविली जावू नये, यासाठी पोलीसांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करण्यात येणार नाही. मादक पदार्थांची विक्री व व्यसन ही समाजाला लागलेली किड आहे. ही किड समाजातून पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पोलीसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. पोलीसांच्या कुटुबिंयांना सर्व सोयीयुक्त निवासस्थाने उपलब्ध होण्यासाठी त्यांच्या निवासस्थांनाची दुरुस्ती करण्यात यावी. समाजातील विघातक, गुन्हेगारी वृत्तींना आळा घालण्यासाठी तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांना पायबंद करण्यासाठी पोलीसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. दामिनी पथके अधिक सजगपणे कार्यान्वित करावित. कायदा व सुव्यवस्था अबाधितपणे राखण्यासाठी पोलीस विभागाला जे जे काही लागेल ते ते तुम्हाला पुरविण्यात येईल, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

शहर पोलीस विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर सुमारे दोन कोटी 50 लक्ष रुपये निधीतून नवीन अठरा चारचाकी, दहा दुचाकी वाहनांची खरेदी तसेच अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण सभागृहाचे नुतणीकरण करण्यात आले आहे. याव्दारे पोलीस विभागाला गस्ती व गुन्हे शोध प्रक्रिया  गतीने पूर्ण करण्यासाठी सहाय्यता होणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती, साईनगर, बडनेरा एमआयडीसी, नांदगाव पेठ एमआयडीसी याठिकाणी नवीन पोलीस ठाणे तसेच सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्प आदींसाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी पोलीस आयुक्त श्री. रेड्डी यांनी पालकमंत्र्यांना केली.

 

0000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती