Monday, February 12, 2024

सैनिक कल्याण विभागामार्फत पदभरती; 3 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

सैनिक कल्याण विभागामार्फत पदभरती; 3 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

       अमरावती, दि. 12 (जिमाका): सैनिक कल्याण विभागाच्या अधिनस्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट क पदासाठी सरळसेवेने पदभरती होणार आहे. इच्छुक पात्रताधारक  माजी सैनिकांनी दि. 3 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आशिष बिजवल यांनी केले आहे.

            जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट क वर्गातील कल्याण संघटक 40 पदे, वसतिगृह अधिक्षक 17, कवायत प्रशिक्षक 1, शारिरिक प्रशिक्षण निर्देशक 1 या पदाकरीता माजी सैनिक उमेदवारांकडून तर वसतीगृह अधीक्षक 3 पदाकरीता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पुर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. वरील पदांपैकी 01 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता उपलब्धतेनुसार भरण्यात येईल.

         भरती प्रक्रिया टिसीएस-आयओएन यांचेमार्फत होणार आहे. पात्र उमेदवारांनी वेब-बेस्ड ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रिक्यूमेंट टॅब सादर करणे आवश्यक राहील. गट क पदांचे अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असून इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. मुदतीनंतर वेबलिंक बंद होईल, याची नोंद घ्यावी.  

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...