जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे व्हिडीओ मेकिंग व भित्तीचित्रकला स्पर्धा

 

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उपक्रम

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे व्हिडीओ मेकिंग व भित्तीचित्रकला स्पर्धा

अधिकाधिक कलावंतांनी सहभागी व्हावे

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. १८ : राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त (२५ जानेवारी) नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे व्हिडीओ व रील मेकिंग स्पर्धा, तसेच अमरावती महापालिकेच्या सहकार्याने भित्ती चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक कलावंतांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

 

व्हिडीओ मेकिंग स्पर्धा

 

ही स्पर्धा १३ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी खुली आहे. स्पर्धक हे वैयक्तिकरीत्या किंवा जास्तीत जास्त तीन सदस्य असलेल्या गटात भाग घेऊ शकतात. गुगल फॉर्मच्या माध्यमातून नोंदणी करता येईल. स्पर्धेला कुठलेही प्रवेशशुल्क नाही. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसाठी २३ जानेवारीपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय मतदार दिन, मतदानाचा अधिकार, मतदानाची ताकद हे स्पर्धेचे विषय आहेत. व्हिडीओ कमीत कमी ३० सेकंद व जास्तीत जास्त ९० सेकंदांचा असावा. स्पर्धकांनी त्यांचे व्हिडीओ फेसबुक, इंस्टाग्राम व ट्विटर या तीनपैकी एका किंवा त्याहून अधिक समाजमाध्यमांवर पोस्ट करणे आवश्यक आहे. स्पर्धेची नोंदणी करताना व्हिडीओची लिंक गुगल फॉर्ममध्ये अपलोड करावी. व्हिडीओसाठी माध्यम म्हणून मराठी, हिंदी किवा इंग्रजी यापैकी कुठलीही भाषा वापरता येईल.  व्हिडीओ गुणात्मकदृष्ट्या उत्तम असावा. त्यासाठी ग्राफिक्स, संगीत व व्हिज्युअल इफेक्टसचा प्रभावी वापर असावा. नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्राधान्य दिले जाईल. त्यानुसार विषयाशी संबंधित कविता, भाषण, लघुनाट्य आदी स्वरूपातील व्हिडीओ करता येईल.

 

व्हिडीओमध्ये कोणताही राजकीय पक्ष, व्यक्ती किंवा संघटनेचा उल्लेख नसावा. कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक भावनांना ठेच पोहोचेल असे संवाद किंवा दृश्ये नसावीत, तसे आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. स्पर्धेसाठी तीन हजार, दोन हजार व एक हजार अशी अनुक्रमे पहिली तीन बक्षीसे व साडेसातशे रूपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षीसे आणि इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व शेअर झालेल्या व्हिडीओ  संकल्पनेसाठी दोन हजार रूपयांचे विशेष पारितोषिक दिले जाईल. व्हिडीओ टाकताना कॅप्शन National Voter’s Day 2023 Video Competition , Amravati Collector, तसेच संपूर्ण नाव (आधारकार्डानुसार), विषय नमूद करावा. व्हिडीओ @ceo_maharashtra, @dio_amravati, @deoamravati यांना टॅग करावा. #nationalvoterday #amravaticollector, #amravaticollectoroffice, #vote, #amravati असे हॅशटॅग जोडावेत.

 

व्हिडीओ मेकिंग स्पर्धेसाठी नोंदणीसाठी लिंक https://forms.gle/zauDZHbw6kAXcWmg7 अशी आहे.

 

भित्तीचित्रकला स्पर्धा

 

भित्तीचित्रकला (वॉल पेंटिंग) स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच नागरिकांसाठी खुली आहे. स्पर्धा दि. २२ जानेवारीला होईल. स्पर्धेला प्रवेशशुल्क नाही. सर्व सहभागींना प्रमाणपत्र दिले जाईल. सहभागींना किमान दोन व जास्तीत जास्त पाच सदस्यांच्या गटात सहभागी होता येईल. स्पर्धेचा विषय राष्ट्रीय मतदारदिन, मतदानाचा अधिकार, मतदानाची ताकद आणि मतदान जागृतीशी संबंधित सर्व बाबी असा आहे. चित्रात राजकीय टिप्पणी नको. धार्मिक, सांस्कृतिक विद्वेष पसरवणारा मजकूर असल्यास कारवाई केली जाईल.  स्पर्धेसाठी ब्रश आणि रंग पुरवले जातील; तथापि, स्केल, पेन्सिल व इतर अनुषंगिक साहित्य स्पर्धकांनी आणणे अपेक्षित आहे. स्पर्धक गटाला चार बाय सहा आकाराचा ब्लॉक दिला जाईल. स्पर्धेची वेळ सकाळी ८ ते ११.३० अशी आहे. वेळेत चित्र पूर्ण करणे अपेक्षित आहे. आयडी कार्ड (आधारपत्र) सोबत आणावे. गुगल फॉर्मवर नोंदणी आवश्यक आहे. स्पर्धेचे ठिकाण ई-मेलद्वारे कळवले जाईल. स्पर्धेसाठी चार हजार, तीन हजार व दोन हजार अशी अनुक्रमे पहिली तीन बक्षीसे व एक हजार रूपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षीसे आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी दीड हजार रूपयांचे विशेष पारितोषिक दिले जाईल.  भित्तीचित्रकला स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी लिंक https://forms.gle/WGomt4Bowj8SgSe7A अशी आहे. उपक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व आय क्लीन संस्थेचे सहकार्य लाभले आहे.

 

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती