निवडणूक सुदृढ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामे करा - निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे

 












अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023

निवडणूक सुदृढ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामे करा

- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे

मास्टर ट्रेनरकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण

       अमरावती, दि. २७ : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या समजून घेऊन नियोजनबध्दरित्या अचूकपणे कामे पार पाडावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपटट्टे यांनी आज येथे दिले.

         पदवीधर मतदार संघाच्या 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने नियोजनभवन येथे मतमोजणीचे सादरीकरणाच्या माध्यमातून दोनशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अमरावतीचे प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावन कुमार, उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावने, विजय भाकरे, अजय लहाने, अपर जिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, रविंद्र महाले यांच्यासह प्रशिक्षणार्थी अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. मास्टर ट्रेनर गजेंद्र बावने व श्यामकांत मस्के यांनी यावेळी उपस्थितांना मतमोजणीचे प्रशिक्षण दिले.

 

        या प्रक्रियेसाठी अमरावती विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून, सुमारे 340 अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणी हा महत्वाचा टप्पा असून सर्व प्रक्रिया नियोजनबध्दरीत्या पार पाडण्यासाठी मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्वांनी जबाबदारी ओळखून कामे करावीत, असे निर्देश श्री. पांढरपट्टे यांनी दिले.

मतमोजणीची प्रक्रिया

बडनेरा येथील नेमाणी गोडावूनमध्ये मतमोजणी दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरु होणार आहे. मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी सहा वाजता मतमोजणी केंद्रावर हजर राहावे. सकाळी 7 वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीसमोर मतपेट्या स्ट्राँग रुममधून आणून उघडण्यात येणार आहेत. मतमोजणीसाठी एकूण अठ्ठावीस टेबल राहणार असून त्यावर 28 चमू मतमोजणीचे काम पार पाडणार आहे.

                                     संशयित मत पत्रिकांवर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश

संशयित बॅलेट पेपरसंदर्भात तत्काळ कार्यवाही होण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे लवकर निर्णय घेऊन प्रक्रिया पूर्ण करतील. प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी कुठलीही चूक होऊ नये म्हणून सर्वांनी जाणीवपूर्वक व खबरदारीपूर्वक काम करावे. मतमोजणीसंदर्भात कुठलाही चुकीचा संदेश प्रसारित होऊ नये म्हणून काळजीपूर्वक काम करावे, असेही निर्देश श्री. पांढरपट्टे यांनी दिले.

             या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम लिहावा लागणार आहे. या मतदान प्रक्रियेविषयी मतदारांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी ‘मतदारांनी मत कसे नोंदवावे याबाबत भारत निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. या सूचनांचा अवलंब करुन मतदारांनी योग्य पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. याबाबत सातत्याने जनजागृती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

 

दिरंगाई किंवा एकही चूक होता कामा नये

           मतमोजणी पूर्व तपासणी, मतमोजणीसाठी अनुषंगीक माहिती नमूद करण्याचे विवरणपत्रे, टपाली मतपत्रिकांची मोजणी, मतपत्रिका वैध व अवैध ठरविणे, अवैध मतपत्रिकांची वर्गवारी, टेबलवरील मतपत्रिका मोजणी आदीबाबत  मास्टर ट्रेनर गजेंद्र बावने यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गणना पर्यवेक्षक व गणना सहायक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे प्रशिक्षकांमार्फत निरसन करण्यात आले. मास्टर ट्रेनर गजेंद्र बावने, श्यामकांत म्हस्के, विवेकानंद काळकर यांनी मतमोजणी करताना विविध टप्प्यावर घ्यावयाच्या काळजीबाबत प्रशिक्षण दिले. मतमोजणीच्या प्रक्रियेत डोळ्यात तेल घालून काम करणे आवश्यक असते. कुठेही दिरंगाई किंवा एकही चूक होता कामा नये. अन्यथा लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार कारवाई केली जाते. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रावर सकाळी सहा वाजताच उपस्थित राहावे व सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. आधीच सर्व शंकांचे निरसन करून घ्यावे, असे श्री. बावने यांनी सांगितले.

 

00000

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती