ई-रजिस्ट्रेशन प्रणालीमुळे घरबसल्या दस्त नोंदणी करता येणार

 ई-रजिस्ट्रेशन प्रणालीमुळे घरबसल्या दस्त नोंदणी करता येणार  

अमरावती, दि. 2 : बांधकाम व्यावसायिकांना स्वत:च्या कार्यालयात बसूनच पक्षकार व त्यांच्यात होणा-या प्रथम विक्रीच्या करारमान्याची नोंदणी करता येणे शक्य आहे. त्यासाठी ऑनलाईन ई-रजिस्ट्रेशन प्रणाली नोंदणी महानिरीक्षक कार्यालयामार्फत विकसित करण्यात आली आहे.

या प्रणालीबाबत बांधकाम व्यावसायिकांची कार्यशाळा नुकतीच नागपूर येथील चिटणीस सेंटर येथे झाली. नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, तसेच नागपूर व अमरावती विभागातील क्रेडाईचे सदस्य, अनेक बांधकाम व्यावसायिक, अधिवक्ते, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

            घरबसल्या दस्त नोंदणीची कार्यवाही करण्यासाठी विकसित केलेली इ-रजिस्ट्रेशन प्रणाली विभागासाठी मैलाचा दगड ठरणारी आहे. बांधकाम व्यावसायिक स्वत:च्या कार्यालयात बसूनच पक्षकार व बांधकाम व्यावसायिकांतील प्रथम विक्रीच्या करारमान्याची नोंदणी या प्रणालीमार्फत करू शकतात. त्यासाठी नोंदणी कार्यालयात जाण्याची कुठलीही आवश्यकता नाही, असे श्री. हर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम प्रकल्पाची सर्व माहिती प्रणालीवर नोंदविणे आवश्यक आहे. ही प्रणाली 24x7 कार्यान्वित राहणार आहे. सुटीच्या दिवशीही बांधकाम व्यावसायिक दस्तऐवज नोंदवू शकतील. या प्रणालीचा वापर केवळ कार्यालयीन वेळेतच करावा असे कुठलेही बंधन नाही. बिल्डर हे त्यांच्या व पक्षकारांच्या सवडीनुसार रात्री उशिरासुध्दा या प्रणालीअंतर्गत दस्त नोंदणी करु शकतात. ही प्रणाली बिल्डर व पक्षकार यांना नोंदणी कार्यालयात दस्त नोंदणीसाठी लागणारा विलंब व दगदग कमी करणारी आहे.

            ई-रजिस्ट्रेशन हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ई-गव्हर्नन्सअंतर्गत केंद्र शासनाचा प्रथम पुरस्कार नोंदणी व मुद्रांक विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे या प्रणालीचा वापर करण्यासाठी बहुसंख्येने बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. हर्डीकर यांनी केले.

प्रणालीचा वापर करताना अडचण आल्यास नोंदणी विभागाने हेल्पलाईनही तयार करण्यात आली आहे.  

            अनिल कपले यांनी सूत्रसंचालन केले. किशोरकुमार मगर यांनी प्रास्ताविक केले. अनिल औतकर यांनी आभार मानले. नागपूरचे नोंदणी उपमहानिरीक्षक राजेश राऊत व अमरावतीचे नोंदणी उपमहानिरीक्षक मोहन जोशी, तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी संजय तरासे, श्री. कांबळे, श्री. एंबडवार, श्री. पगार, श्री. घोंगडे आदी उपस्थित होते.

*****

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती