राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उपक्रम भित्तीचित्रकला स्पर्धेत शेकडो कलावंतांचा सहभाग मतदानाच्या महत्वाबाबत रेखाटली अनेकविध चित्रे

 















राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उपक्रम

भित्तीचित्रकला स्पर्धेत शेकडो कलावंतांचा सहभाग

मतदानाच्या महत्वाबाबत रेखाटली अनेकविध चित्रे

 

अमरावती, दि. 22 : राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भित्ती चित्रकला स्पर्धा आज झाली. त्यात जिल्ह्यातील शेकडो कलावंतांनी सहभाग घेऊन मतदानाच्या अधिकाराचे महत्व विशद करणारी अनेक आकर्षक चित्रे काढली. विद्यार्थी व तरूण कलावंतांचा सहभाग लक्षणीय होता.

 

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी भित्ती चित्रकलेच्या (वॉल पेटींग) ठिकाणी आज प्रत्यक्ष भेट देऊन सहभागी स्पर्धकांचे कौतूक करीत उत्साह वाढविला.  निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी रिचर्ड यानथन, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह चित्रकला महाविद्यालयाचे शिक्षकवृंद, मनपा शाळेचे कलाशिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थींनी यावेळी उपस्थित होते.

 

भित्तीचित्रकला (वॉल पेंटिंग) स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच नागरिकांसाठी खुल्या स्वरुपात नि:शुल्क आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा विषय राष्ट्रीय मतदारदिन, मतदानाचा अधिकार, मतदानाची ताकद आणि मतदान जागृतीशी संबंधित सर्व बाबी असा होता.  स्पर्धकांना ब्रश आणि रंग आदी साहित्य पुरविण्यात आले होते. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना चार हजार, तीन हजार व दोन हजार अशी अनुक्रमे पहिली तीन बक्षीसे व एक हजार रूपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षीसे आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी दीड हजार रूपयांचे विशेष पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. त्याशिवाय, व्हिडीओ मेकिंग स्पर्धाही आयोजित करण्यात आली असून, त्यासाठी विविध आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. स्पर्धांचे बक्षीसवितरण राष्ट्रीय मतदारदिनी होणार आहे.

 

व्हिडीओ मेकिंग स्पर्धा

 

ही स्पर्धा १३ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी खुली आहे. स्पर्धक हे वैयक्तिकरीत्या किंवा जास्तीत जास्त तीन सदस्य असलेल्या गटात भाग घेऊ शकतात. गुगल फॉर्मच्या माध्यमातून नोंदणी करता येईल. स्पर्धेला कुठलेही प्रवेशशुल्क नाही. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसाठी २३ जानेवारीपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय मतदार दिन, मतदानाचा अधिकार, मतदानाची ताकद हे स्पर्धेचे विषय आहेत. व्हिडीओ कमीत कमी ३० सेकंद व जास्तीत जास्त ९० सेकंदांचा असावा. स्पर्धकांनी त्यांचे व्हिडीओ फेसबुक, इंस्टाग्राम व ट्विटर या तीनपैकी एका किंवा त्याहून अधिक समाजमाध्यमांवर पोस्ट करणे आवश्यक आहे. व्हिडीओ मेकिंग स्पर्धेसाठी नोंदणीसाठी लिंक https://forms.gle/zauDZHbw6kAXcWmg7 अशी आहे.

 

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती