Monday, May 22, 2023

जागतिक तंबाखू नकार दिन 31 मे रोजी कर्करोगपूर्व लक्षणांची तपासणी

 

जागतिक तंबाखू नकार दिन 31 मे रोजी

कर्करोगपूर्व लक्षणांची तपासणी

 

                 अमरावती, दि. 22: तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण तरूणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करीत असलेल्या व्यक्तीने दर महिन्याला तोंडाची तपासणी करावी. जीभ, गालाच्या आतील भागावर, हिरड्यांवर, घश्यामध्ये कर्करोगपूर्व लक्षण जसे लाल चट्टा, पांढरा चट्टा, तोंड उघडता न येणे किंवा 15 दिवसापेक्षा जास्त काळापासून न बसलेली जखम असेल तर लवकरच जवळच्या शासकीय रूग्णालयात दंत शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घ्यावी. लक्षणे आढळलेल्या रूग्णांना विभागीय संदर्भ सेवा रूग्णालय अमरावती येथे पुढील तपासणी व उपचाराकरिता पाठविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

             जागतिक तंबाखू नकार दिन 31 मे रोजी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यामध्ये आरोग्य विभागासोबत पोलिस, शिक्षण, जिल्हा माहिती कार्यालय, सलाम मुंबई फाऊंडेशन यांची मदत घेण्यात येत आहे. तंबाखूचे उत्पादन आणि सेवन यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक असून यामुळे होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगासाठी पहिला क्रमांक लागतो. सुरूवातीच्या टप्प्यावर उपचार केले तर रूग्णाचे आयुष्य वाचविता येते. परंतु निदान व उपचारास उशीर झाल्यास रूग्ण लवकर दगावतो. असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, मद्याचे अतिप्रमाणात सेवन, तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन आणि ताणतणाव यावर नियंत्रण ठेवले तर या आजारामुळे होणारे 70 ते 80 टक्के मृत्यू टाळता येणे शक्य आहे.

           तंबाखूच्या वापरला आळा बसावा म्हणून सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणे कोटपा 2003 कलम 4 अंतर्गत गुन्हा ठरवण्यात आला असून त्यात दोनशे रूपये दंडाची तरतूद आहे. तसेच लहान मुलांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी कलम 6 ब नुसार शैक्षणिक संस्थेच्या शंभर मीटर परिसरात तंबाखू विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहून आपल्या परिवाराला निरोगी ठेवा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...