जिल्हाधिका-यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

 










जिल्हाधिका-यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

पंचनाम्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 1 : अवकाळी पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेती व घरांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाचे पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी. नुकसानग्रस्तांशी संवाद साधून प्रत्येक बाबीची नोंद पंचनाम्यात घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यात वादळ, वा-यासह अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेती व घरांच्या नुकसानाची पाहणी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज विविध ठिकाणी भेट देऊन केली. यावेळी त्यांनी बाधित क्षेत्रात शेतात जाऊन पीक नुकसानीची माहिती घेतली  व शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी अंजनगाव बारी, भानखेड येथे जाऊन शेती नुकसानीची पाहणी केली. त्यांनी अंजनगाव बारी येथे प्रकाशराव दातिर, भानखेड येथे श्री. जवादे यांच्या शेतात भेट दिली. तहसीलदार संतोष काकडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते, गटविकास अधिकारी, महसूल, कृषी, पं. स. अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिका-यांनी गावांतील शेतकरी बांधवांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या.

शेती व घरांच्या नुकसानाची सविस्तर नोंद पंचनाम्यात घ्यावी. एकही नुकसानग्रस्त व्यक्ती भरपाईपासून वंचित राहता कामा नये याची दक्षता घ्यावी. पंचनाम्याची प्रक्रिया उद्यापर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले. त्यानंतर त्यांनी पोहरा येथे भेट देऊन क्षतिग्रस्त घरांची पाहणी केली. वादळ, वारा व पावसाने पोहरा येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिका-यांनी पोहरा येथे रामा चव्हाण, किशोर चव्हाण, कमल राठोड, अविनाश राठोड यांच्यासह विविध नुकसानग्रस्तांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी नुकसानग्रस्त बांधवांशी संवाद साधून दिलासा दिला. पोहरा येथील नुकसानग्रस्त बांधवांच्या अडचणी जाणून आवश्यक सुविधा तत्काळ पुरवाव्यात. वीजपुरवठा प्राधान्याने सुरळीत करावा. पेयजलासाठी आवश्यक टँकरची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती