स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 2 कोटी 5 लाखांचा निधी प्राप्त

 

स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 2 कोटी 5 लाखांचा निधी प्राप्त

अमरावती, दि. 29 : अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व अन्य आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते. विद्यार्थ्यांना 13 जून 2018 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात आली आहे. सन 2020-21 व 2021-22 मधील  एकूण 703 विद्यार्थ्यांना शासनाकडून 2 कोटी 4 लक्ष 91 हजार रुपयांचा निधी मिळाला असून यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या किंवा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी व 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालय, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व अन्य आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत प्रति विद्यार्थ्याला एकूण संभाव्य रक्कम 51 हजार रुपये देय आहे. यामध्ये भोजन भत्ता 28 हजार रुपये, निवास भत्ता 15 हजार रुपये, निर्वाह भत्ता 8 हजार रुपये असा समावेश आहे.

स्वाधार योजनेचे निकष

            स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. तसेच तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाचा असावा. विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेला व प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल. विद्यार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक त्यांने ज्या राष्ट्रीयकृत व शेड्युल बँकेत खाते उघडले आहे, त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. तसेच विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. केंद्र शासनामार्फत ज्या-ज्यावेळी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकांची उत्पन्न वार्षिक मर्यादा त्या-त्या प्रमाणे लागू राहील. तसेच विद्यार्थी हा स्थानिक नसावा. महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात तसेच शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहे.

            या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी इयत्ता 10 वी, 12 वी आणि त्यानंतरचे उच्चशिक्षण घेणारा असावा. विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम किमान दोन वर्षांचा असावा. 11 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास 10 वी मध्ये किमान 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील. त्यासाठी या विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल, अशी माहिती समाज कल्याण विभागामार्फत देण्यात आली आहे.

00000

***

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती