बुध्द पौर्णिमेला वनप्रेमींनी घेतला निसर्ग अनुभव ठिकठिकाणी 21 वाघांचेही दर्शन

 




बुध्द पौर्णिमेला वनप्रेमींनी घेतला निसर्ग अनुभव

ठिकठिकाणी 21 वाघांचेही दर्शन

 

           अमरावती, दि. 8 : वनविभागातर्फे बुध्द पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आयोजित निसर्ग अनुभव कार्यक्रमात 140 निसर्गप्रेमींनी अरण्यातील मचाणीवर रात्रभर बसून पाणवठ्यावर येणाऱ्या वन्य प्राण्यांचे निरीक्षण व रोमांचक अनुभव घेतला. बुद्धपौर्णिमेच्या टिपूर चांदण्यात अनेक प्राण्यांसह ठिकठिकाणी 21 वाघांचेही दर्शन वन्यप्रेमींना झाले.

          पूर्वी या उपक्रमाला प्राणीगणना म्हटले जाई; पण आता शास्त्रशुध्द प्रणालीचा अवलंब वन्यप्राण्यांच्या अभ्यासाची जोड देत या उपक्रमाचे रुपांतर ‘निसर्ग अनुभवमध्ये करण्यात आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना, अकोट, गुगामल, मेळघाट वन्यजीव विभाग तर अकोला, पाढंरकवडा या वन्यजीव विभागामध्ये निसर्गप्रेमींना ऑनलाईन पध्दतीने मचाण आरक्षित करण्याची सोय देण्यात आली. यंदा पुणे, मुंबई, नाशिक, यवतमाळ, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, नंदुरबार व हैदराबाद येथील 140 निसर्ग प्रेमींनी यामध्ये सहभाग नोंदविला. या उपक्रमात सहभागींना शुल्क स्वीकारून जेवण, नाश्ता, पिण्याचे पाण्याची कॅन, मचाणीवर सोडणे व आण्यासाठी वाहन, कॅप आणि मेळघाट माहिती पुस्तिका आदींचा समोवश होता.

          मचाणीचे वाटप सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींना ईश्वरचिठ्ठीने करण्यात आले. प्रत्येक निसर्गप्रेमीसोबत एक वन कर्मचारी, निसर्ग मार्गदर्शक यांना मचाणीवर बसण्यासाठी पाठविण्यात आले. पाणवठ्यावर दिसलेल्या वन्यप्राण्यांची नोंद घेण्याकरतिा वन्यप्राणी नोंद पत्रक  देण्यात आले होते.

पौर्णिमेच्या लख्ख उजेडाने उजळून निघालेले निबिड अरण्य, निरामय शांततेत मध्येच ऐकू येणारे प्राण्यांचे आवाज, रातकिड्यांची किरकिर, हवेच्या मंद झुळका अशा भारून टाकणा-या वातावरणात निसर्ग अनुभवाला सुरूवात झाली. पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येणारे बिबट, अस्वल, रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, उदमांजर अशा अनेक प्राण्यांसह वाघही अनेकांना पाहायला मिळाला.  मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ठिकठिकाणी एकूण 21 वाघांचे दर्शन झाले. हा अनुभव प्रत्येक निसर्गप्रेमीसाठी अविस्मरणीय ठरला.  पुढील वर्षाच्या निसर्ग अनुभव उपक्रमाची उत्कंठा असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे बफर क्षेत्रात दर महिन्याच्या पौर्णिमेदरम्यान निसर्ग अनुभव उपक्रम नियमितपणे राबविण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. यामुळे बुध्द पौर्णिमेस संधी न मिळालेल्या निसर्ग प्रेमीनादेखील मचाणावर बसण्याची संधी मिळू शकेल.

            मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक जयोती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील उपवनसंरक्षक जयकुमार,  अकोट वन्यजीव विभागाचे  उपवनसंरक्षक   सुमंत सोळंके, गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक दिव्या भारती, सिपना वन्यजीव विभाग, तसेच विभागीय वनअधिकारी किरण जगताप, पांढरकवडा विभागीय अधिकारी निमजे, अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, वनमजूर यांनी अथक परिश्रम घेतले.

00000

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती