मेळघाटात विनाविलंब टँकर सुरू करण्यासाठी मान्यतेचे अधिकार धारणी ‘एसडीओं’ना प्रदान - जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्याकडून आदेश निर्गमित

 


टंचाई निवारणासाठी आवश्यक ठिकाणी तत्काळ कार्यवाहीचे आदेश

मेळघाटात विनाविलंब टँकर सुरू करण्यासाठी मान्यतेचे अधिकार धारणी ‘एसडीओं’ना प्रदान

-     जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्याकडून आदेश निर्गमित

 

अमरावती, दि. २७ : मेळघाटात पाणीटंचाई उद्भवल्यास टँकर सुरू करण्याची कार्यवाही विनाविलंब व्हावी, यासाठी टँकरच्या मान्यतेचे अधिकार धारणी उपविभागीय अधिका-यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी निर्गमित केला आहे. जिल्ह्यात कुठेही टंचाई उद्भभवू नये म्हणून उपविभाग व तहसीलस्तरीय अधिका-यांनी दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील टंचाईबाबत जिल्हाधिका-यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची ऑनलाईन बैठक घेऊन परिस्थितीचा नुकताच आढावा घेतला. जिल्ह्यात सद्य:स्थितीत 4 ठिकाणी टँकर सुरू आहेत. त्यात चिखलदरा तालुक्यात तीन ठिकाणी आणि चांदूर रेल्वे तालुक्यात एका ठिकाणी टँकर सुरू आहे. चिखलदरा व मेळघाटातील स्थिती लक्षात घेऊन तिथे पाणीटंचाई उद्भवल्यास विनाविलंब टँकर सुरू करता यावा, यासाठी टँकरच्या मान्यतेचे अधिकार धारणी येथील उपविभागीय अधिका-यांना प्रदान करण्याचा निर्णय जिल्हाधिका-यांनी घेतला व तसे आदेशही निर्गमित केले आहेत.

त्यानुसार मेळघाटातील दोन्ही तालुक्यात टंचाई उद्भवण्याचे लक्षात येताच धारणी येथील उपविभागीय अधिकारी स्वत:च्या अधिकारात थेट टँकर सुरू करू शकतील. त्यासाठी जिल्हास्तरावर प्रस्ताव पाठविणे आदी प्रक्रियेत वेळ न जाता गतीने कार्यवाही होऊ शकेल. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत हे आदेश लागू राहतील.

 ‘एसडीओ’ व तहसीलदारांनी  सातत्याने परिस्थितीचा आढावा घ्यावा व टंचाई निदर्शनास येताच टँकर सुरू करून आवश्यकतेनुसार फे-या होतील व पाण्याची कमतरता जाणवणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. भाकरे यांनी दिले. दरम्यान, पाणी टंचाई निवारणासाठी खासगी टँकरला मुदतवाढ देण्याचा आदेशही निर्गमित करण्यात आला आहे.

 

खडीमल येथील पाणीपुरवठा नियमित

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खडीमल या गावातील दोन विहिरींचे पाणी अचानक आटल्याने पाण्याची समस्या उद्भवली होती. हे लक्षात घेऊन याठिकाणी दि. 15 मेपासून टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पाण्याच्या समस्येबाबत माहिती मिळताच चिखलदरा येथील तहसीलदार, गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा अभियंत्यांनी त्या ठिकाणी दि. 15 मे रोजी भेट देऊन पाहणी केली व चुनखडी येथील साहेबलाल बैठेकर यांच्या विहिरीवरून 4 टँकरद्वारे पुरवठा सुरू करण्यात आला आहे. एकूण आठ फे-यांद्वारे गावात आवश्यकतेनुसार नियमितपणे पाणीपुरवठा सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार माया माने यांनी दिली.

खेडोपाडी पाण्याची पुरेशी उपलब्धता असण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी वेळोवेळी आढावा घ्यावा. आवश्यक तिथे स्वत: भेटी द्याव्यात व पाण्याची समस्या आढळल्यास तत्काळ कार्यवाही करावी. खडीमल गावातील, तसेच जिल्ह्यात इतरत्र सुरू असलेली ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती