Thursday, May 4, 2023

‘आयटीआय’च्या मुलांनी निर्माण केली खुली व्यायामशाळा

 








‘आयटीआय’च्या मुलांनी निर्माण केली खुली व्यायामशाळा

उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनेतून स्वयंरोजगार सक्षमता

-         सहसंचालक प्रदीप घुले

 

       अमरावती, दि. ४ : खेड्यापाड्यातून अमरावतीत आलेल्या तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने खुल्या व्यायाम शाळेची सामग्री तयार केली आहे. व्यायामासाठी लागणारी दहा अद्यावत उपकरणे विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत.  उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे प्रतिपादन सहसंचालक प्रदीप घुले यांनी आज येथे केले.

       औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांद्वारे तयार करण्यात आलेली व्यायाम साधनसामग्रीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संस्थेचे उपसंचालक एस. के. बोरकर, उपप्राचार्य आज. जी. चुलेट, वरूडचे प्राचार्य विवेक पडोळे, तांत्रिक सल्लागार के. एस. वानखडे, फिटर शिल्पनिदेशक पी.एस. घुटे, वेल्डर शिल्पनिदेशक आर. बी. धोटे, शिल्पनिदेशक रविंद्र दांडगे, भांडारपाल बी. डब्ल्यु काजळकर यांच्यासह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी-विद्यार्थिंनी यावेळी उपस्थित होते.

श्री. घुले म्हणाले की, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण हे प्रात्याक्षिकाधारित असते. प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे व त्यांच्यात कौशल्य विकसित करणे हा एकमेव उद्देश यात असतो. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमध्ये संबंधित व्यवसाय अभ्यासक्रमाचे उत्तम कौशल्य विकसित होण्यासाठी, तसेच स्वयंरोजगाराची आवड निर्माण होण्यासाठी उत्पादनाभिमुख प्रशिक्षण दिले जाते. संस्थेच्या फिटर, वेल्डर व टर्नर या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी शिल्पनिदेशकांच्या मार्गदर्शनात ओपन जिमच्या अद्ययावत उपकरणांची कौशल्यपूर्ण व आकर्षक बांधणी, जोडणी करुन दहा उपकरणे तयार केली आहेत.  ही संस्थेसाठी अभिमानाची व कौतुकाची बाब आहे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी ओपन जीमची लेग प्रेस, रोवर, स्कॉय वाकर, चेस्ट प्रेस, स्टॅन्डींग सिटींग व्टिस्टर, शोल्डर बिल्डर, एअर वाकर, सिंगल बार, सायकल, डबल बार अशी दहा व्यायामाची उपकरणे तयार केली आहेत. यास अडीच लाख रु. खर्च आला असून याचे बाजार मुल्य पाच लक्ष रू. एवढे आहे. सद्यस्थितीत आयटीआय संस्थेला दहा ऑर्डर प्राप्त झाल्या असून निर्माण करण्यात येणाऱ्या उपकरणांच्या निधीतून महसूल म्हणून अर्धी रक्कम जमा करण्यात येईल. उर्वरित रकमेतून शिल्पनिदेशक व प्रशिक्षणार्थींना मोबदला दिला जाणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकाधिक रोजगाराभिमुख प्रशिक्षणाकडे वळावे यासाठी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत नव्याने अनेक अभ्यासक्रम सुरू होत आहेत.  त्यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिकरीत्या रोजगार मिळू शकेल, अशी माहिती श्री. घुले यांनी दिली.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...