हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रयोगशील शेतक-यांचा गौरव
शेतीला पूरक व्यवसायांची जोड द्यावी
-         पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील
अमरावती, दि. 1 :  कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी पारंपरिक शेतीत नव्या प्रयोगांची आवश्यकता असून, शेतकरी बांधवांनी शेतीला पूरक व्यवसायांची जोड द्यावी, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले.
हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील प्रयोगशील शेतक-यांचा गौरव  पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. खासदार आनंदराव अडसूळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, प्रकाश साबळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, पूरक व्यवसायासाठी राज्य शासनाकडून अनेकविध योजना अमलात आल्या आहेत. सिंचनाबाबत नदीजोडसह अनेक अभिनव प्रयोगांचे केंद्र व राज्य शासनाचे नियोजन आहे. शेतीमालावर प्रक्रियेसाठी प्रोत्साहन व साह्य दिले जात आहे. जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त शेतकरी बांधवांचे शेतीतील अभिनव प्रयोग मार्गदर्शक ठरणारे असल्याचेही ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी हरितक्रांती घडवून आणली. त्यांनी विविध योजनांतून सिंचन व ग्रामीण भागात मोठी रोजगार निर्मिती घडवून आणली. त्यांचे कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान आहे, असेही त्यांनी सांगितले.  
शेतक-यांच्या प्रश्नांकडे प्रशासनासह सर्वांनी संवेदनशीलतेने पाहण्याची गरज श्री. अडसूळ यांनी व्यक्त केली.  
प्रयोगशील शेतक-यांचा गौरव
यावेळी सेंद्रिय शेती प्रयोगाबाबत विनय पाटील (वडगाव माहोरे), प्रदीप ओक (धामोरी, ता. भातकुली), विनोद कडगे (ममदापूर, ता.तिवसा), रमेश साकरकार (भिल्ली, ता. धामणगाव रेल्वे), पंजाबराव पाटील (रिद्धपूर ता. मोर्शी), शशीभूषण उमेकर (टेंभुरखेडा, ता. वरुड), बाळकृष्ण धांडे (वाढोणा, ता. अचलपूर), गोपाळ ठाकरे (तुरखेड, ता. अंजनगाव सुर्जी), अतुल गावंडे (कळाशी, ता. दर्यापूर) व कन्हैयालाल भिलावेकर (चिंचघाट, ता. धारणी) यांचा गौरव करण्यात आला.
 त्याचप्रमाणे, बागायती व फळपीक प्रयोगाबद्दल बाबुलाल जावरकर (चिलाटी, ता. चिखलदरा), मत्स्यव्यवसाय, शेळीपालन पूरक उद्योगाबद्दल श्रीकांत धांडे (इनायतपूर, ता. चांदूर बाजार), एलपीजी गॅसऐवजी संपूर्ण बायोगॅसचा वापर व सूक्ष्म सिंचन प्रयोगाबद्दल प्रदीप मोहतुरे (धनोडी, ता. चांदूर रेल्वे) व फळपीके प्रयोगाबद्दल सुनील साठे (खेड पिंप्री, ता. नांदगाव खंडेश्वर) यांना गौरविण्यात आले.
00000




Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती