समाजातील शेवटच्‍या माणसांपर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्‍य निर्माण होणार नाही - मुख्‍यमंत्री


            पुणे, दि. 23 : आता सुराज्‍याची लढाई लढावी लागेल, नव्‍या पिढीला सुराज्‍य द्यावे लागेल.  समाजातील शेवटच्‍या माणसांपर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्‍य निर्माण होणार नाही, असे स्‍पष्‍ट मत मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्‍यक्‍त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका व क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगाव येथे क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्‍याच्‍या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.  अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्‍मण जगताप, महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकरउपमहापौर शैलजा मोरे,  क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे,क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड सतिश गोरडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्‍या  अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे होते. 
            मुख्‍यमंत्री श्री.फडणवीस म्‍हणाले, जो समाज इतिहास विसरतो, त्‍याला वर्तमानकाळ असतो, मात्र भविष्‍यकाळ नसतो. क्रांतीवीर चापेकर बंधूंच्‍या स्‍मारकातून नव्‍या पिढीला प्रेरणा मिळणार आहे. संग्रहालयात क्रांतीकारकांची आठवण जागृत ठेवली जाणार आहे. क्रांतीकारकांच्‍या बलिदानाचे मोल समजले नाही तर स्‍वातंत्र्य धोक्‍यात येणार आहे. देशाचा इतिहास जागृत ठेवायला हवा, असे नमूद करुन  नवीन पिढीला सुराज्‍य द्यावे लागेल, असे सांगितले. समाजाच्‍या शेवटच्‍या माणसापर्यंत विकास पोहोचल्‍याशिवाय सुराज्‍य निर्माण होणार नाही, असे स्‍पष्‍ट केले.
आपल्‍या भाषणाच्या प्रारंभी मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी क्रांतीची प्रेरणा देणा-या लोकमान्‍य टिळकांच्‍या स्मृतीला अभिवादन केले. तसेच तरुणांच्‍या मनात क्रांतीची ज्‍योत पेटवणा-या चापेकर बंधूंच्या स्मृतिला वंदन केले. आषाढी एकादशीच्‍या दिवशी आपण पांडुरंगाला स्‍मरतो. आज महाराष्‍ट्रातील 12 कोटी जनता विठ्ठल-रखुमाईसारखी असून आपले दर्शन घेण्‍याचा मला योग आला. हा दिवस माझ्यासाठी भाग्‍याचा आहे, पांडुरंग आपल्‍या जीवनात आनंद आणो, असे भावपूर्ण उद्‌गार त्यांनी काढले.
 मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी क्रांतीवीर चापेकरांच्‍या कार्याचे स्‍मरण केले. 19 व्‍या शतकाच्‍या शेवटी पुण्‍यनगरी प्‍लेगची साथ पसरली होती. रँड नावाच्‍या इंग्रज अधिका-याने पुण्‍यातील नागरिकांवर अनन्वित अत्‍याचार केले. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेवून  चापेकर बंधूंनी नागरिकांवरील अत्‍याचाराचा बदला घेतला. या संग्रहालयात अनेक क्रांतीकारकांच्‍या स्‍मृति जतन केल्‍या जातील, त्‍यापासून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्त केला. पिंपरी-चिंचवडमधील प्रश्‍नांचा उल्‍लेख करुन मुख्‍यमंत्री फडणवीस म्‍हणाले, शास्‍तीकराचा मुद्दा महत्‍वाचा असून पूर्वलक्षी प्रभावाने शास्‍तीकर संपवणार आहे. यात काही त्रुटी असून त्‍याबाबत लवकरच बैठक घेण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या भागातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असून नियमितीकरणाचे शुल्‍क किती घ्‍यायचे याचे अधिकार महापालिकेला देण्यात येतील, असेही ते म्‍हणाले.
पालकमंश्री गिरीश बापट यांनी क्रांतीवीर चापेकर स्मृती संग्रहालयाच्‍या भूमिपूजनाचा कार्यक्रम ऐतिहासिक असल्‍याचे सांगि‍तले.  चापेकर बंधूंनी देशात आदर्श निर्माण केला. तरुणांना त्‍यापासून प्रेरणा मिळेल. पिंपरी-चिंचवडमधील प्रश्‍नांचा उल्‍लेख करुन शासन पूर्णपणे  पाठीशी राहील, असेही ते म्‍हणाले.
संग्रहालयाच्या तिस-या मजल्यावर प्रबोधन पर्वाचा इतिहास सचित्र दाखविण्यात येईल. यात राजा राममोहन राय यांच्या पासून महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व प्रबोधन चळवळींचा इतिहास, त्याबरोबर स्वामी परमहंस, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल या सर्व चळवळींचा सचित्र इतिहास ठेवण्यात येणार आहे. संग्रहालयाच्या पाचव्या मजल्यावर 350 आसन क्षमतेचे सभागृह असणार आहे. सहाव्या मजल्यावर स्मारक समिती अन्य उपक्रम रेकॉर्डिंग रूम, बैठक असणार आहे. यात ऐतिहासिक पुरातन काळात वापरण्यात येणाऱ्या वस्तू, भांडी, वेशभूषा, अलंकार, युद्ध कलेचे साहित्य, गडकोट, किल्ल्यांच्या प्रतिकृती,पुरातन भित्तिचित्रे यांचा समावेश असेल.त्यातून देशभरातील भारतीय संस्कृति, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणारे दोन हजार वर्षातील घटना आणि घडामोडींवर चिरंतन स्मृति जपणारे हे सहा मजली राष्ट्रीय संग्रहालय उभारणार आहे.
000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती